जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड २०१८’चा मुकुट मेक्सिकोच्या व्हेनेसा पोन्स डी लिऑन हिने पटकावला. चीनच्या सान्या शहरात ६८ वी ‘मिस वर्ल्ड २०१८’ स्पर्धा आयोजित केली गेली. गतवर्षी भारताची सौंदर्यवती मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली होती. मानुषीनेच व्हेनेसाला मिस वर्ल्डचा मुकुट घातला. या स्पर्धेत विविध देशांतील ११८ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

‘मिस वर्ल्ड २०१८’ या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची अनुकृती वास ही टॉप ३० पर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. तर थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती ठरली. यंदाची ‘मिस वर्ल्ड’ व्हेनेसाबद्दल जाणून घेऊयात काही गोष्टी..

– व्हेनेसाचा जन्म ७ मार्च १९९२ रोजी झाला असून ती मेक्सिकन मॉडेल आहे.

– ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी ती पहिलीच मेक्सिकन तरुणी आहे.

– सौंदर्य आणि बुद्धी अशा दोन्ही गोष्टींची दैवी देणगी लाभलेली व्हेनेसा २०१४पासून मॉडेलिंग क्षेत्रात आहे. यासोबतच सामाजिक कार्यातही तिचा सहभाग आहे.

– व्हेनेसा उत्तम स्कूबा डायव्हरसुद्धा आहे.

– व्हॉलीबॉल खेळणं, पेंटिंग करणं तिला फार आवडतं.