सध्या रिक्रिएटेड गाण्यांचा ट्रेण्ड असला तरी बऱ्याच गाण्यांचे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना फारसे आकर्षित करत नाहीत. त्यामुळे कित्येक गाजलेल्या गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन टिकेला कारणीभूत ठरतात. अशातच ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील सुष्मिता सेनच्या ‘दिलबर’ या गाण्याचं नवीन व्हर्जन मात्र खूप गाजतंय. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात ‘दिलबर’चं रिक्रिएटेड व्हर्जन पाहायला मिळत आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. गाण्याला अरेबियन तडका आणि नोरा फतेहीचा अप्रतिम बेली डान्स प्रेक्षकांना इतका भावला की अल्पावधीतच या गाण्याला युट्यूबवर १० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्यात अप्रतिम बेली डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी नोरा फतेही मोरक्कन- कॅनेडियन अभिनेत्री आहे. २०१४मध्ये तिनं ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटातही ती झळकली. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधील आयटम साँग्समुळे ती प्रकाशझोतात आली. ‘टेम्पर’, ‘बाहुबली’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयटम साँग्स विशेष गाजले.

वाचा : ‘गोल्ड’साठी जमवली तब्बल दोन हजार कलाकारांची फौज

अप्रतिम बेली डान्स कौशल्यामुळे नोराने अत्यंत कमी वेळात आपली ओळख प्रस्थापित केली. करिअरच्या सुरुवातीला याच बेली डान्समुळे कुटुंबाचा गाडा चालवण्यास मदत झाल्याचं ती अभिमानानं सांगते. ‘दिलबर’ या मूळ गाण्यात अभिनेत्री सुष्मिता सेनच्या घायाळ अदांनी चाहत्यांना भुरळ घातली होती. त्यानंतर आता रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये नोराच्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.