सध्या मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात सनई चौघड्यांचे सूर घुमत आहेत. त्यातही क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमध्ये असलेलं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. भारतीय गोलंदाज झहीर खानने अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला तर स्टार खेळाडू विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माशी इटलीत लग्नगाठ बांधली. तर भुवनेश्वर कुमारने नुपूर नगर हिच्याशी लग्न केले. पण, विराट आणि अनुष्काच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा रंगली. या जोडप्याने गुपचूप परदेशात जाऊन लग्न केल्याने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. विरुष्कानंतर आता आणखी एक खेळाडू आयुष्याची नवीन इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो क्रिकेटपटू म्हणजे क्रुणाल पांड्या.

वाचा : सई-शरदची जोडी जमली रे!

भारतीय संघातील ऑल राउंडर आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा भाऊ क्रुणाल त्याची प्रेयसी पंखुरी शर्मा हिच्याशी येत्या २७ डिसेंबरला विवाहबंधनात अडकेल. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. ‘पंखुरी माझ्या मित्राची मैत्रीण आहे. एका कार्यक्रमात दोन वर्षांपूर्वी आमची ओळख झाली. त्यानंतर आमची मैत्री झाल्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तिच्यातील साधेपणा आणि साहाय्य करण्याची वृत्ती मला फार आवडते’, असे क्रुणालने एका मुलाखतीत सांगितले होते.

वाचा : जाणून घ्या, सलमान-कतरिनाच्या ‘टायगर जिंदा है’ ची कमाई

पंखुरी ही मॉडेल असून प्रोफेशनल स्टायलिस्टही आहे. सध्या ती फिल्म मार्केटिंगमध्ये कार्यरत असल्याचे कळते. खरंतर पंखुरीला क्रिकेटमधलं फार काही कळत नाही आणि तिला हा खेळही आवडायचा नाही. मात्र, तिच्या स्वप्नातील राजकुमारच क्रिकेटपटू असल्यामुळे तिला हळूहळू या खेळाचे महत्त्व कळू लागले. तिच्या आयुष्यात क्रुणाल आल्यानंतर तिने क्रिकेट पाहण्यास सुरुवात केली. मात्र, ज्या सामन्यांमध्ये क्रुणाल असतो तेच सामने ती न चुकता पाहते. याविषयी क्रुणाल म्हणालेला की, माझ्या आयुष्यात क्रिकेट नेहमीच अग्रस्थानी असेल. हेच माझं आयुष्य आहे याची पंखुरीला जाणीव असल्यामुळे ती मला नेहमी पाठिंबा देते. तिला क्रिकेट पाहायला आवडत नाही. पण ज्या सामन्यांमध्ये मी खेळतो ते सामने ती आवर्जून पाहते.