उत्साह आणि ऊर्जा म्हटलं की बॉलिवूडचा ‘बाजीराव’ अभिनेता रणवीर सिंगचं नाव आवर्जून घेतलं जातं. पार्टी, लग्नसोहळा असो किंवा एखादा कार्यक्रम, रणवीरच्या उपस्थितीने तिथे वेगळंच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. चित्रपटाच्या सेटवरही खेळीमेळीचं वातावरण ठेवण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो आणि सहकलाकारांसोबत मिळून मौजमजा करण्यातही तो अग्रेसर असतो. पण रणवीरच जर एखाद्याला शांत राहण्यास सांगत असेल तर त्यामागचं कारणही वेगळंच असेल. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला तो ‘शट अप’ म्हणाला आहे. त्याचा व्हिडिओ सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

रणवीर आणि सोनाक्षीने ‘लुटेरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं आणि त्यानंतर दोघांमध्ये गट्टी जमली. सोनाक्षीनं पोस्ट केलेल्या या व्हि़डिओमध्ये ते दोघेही ‘सायलेन्स प्लीज’च्या फलकासमोर उभे असल्याचे दिसते. सोनाक्षी तिथं मोठ्यानं गायचा प्रयत्न करते. पण रणवीर तिला थांबवतोय. दोघंही एका डबिंग स्टुडिओच्या बाहेर उभे आहेत. आगामी ‘पद्मावती’ चित्रपटासाठी रणवीर डबिंग डिओजवळ पोहोचला असता तिथं त्याची भेट सोनाक्षीशी झाली. बघा, कोण कोणाला गप्प बसण्यास सांगत आहे, अशी कॅप्शन तिने या व्हिडिओला दिली आहे.

दरम्यान, रणवीरचा ‘पद्मावती’ १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा राणी पद्मावतीच्या आयुष्यावर आधारित आहे.