श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांत ऐकायला मिळाल्या. मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’मध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे. पदार्पणापूर्वीच तिचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिचे स्टाईल स्टेटमेंट, फॅशन, लूक या सर्वांची सोशल मीडियावर चर्चा होतच असते. अशातच ती अभिनयात आई श्रीदेवीचे अनुकरण करेल का, श्रीदेवीची छाप तिच्या अभिनयात दिसेल का, असे बरेच प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाले. या सर्व प्रश्नांवर बोनी कपूर यांनी उत्तर दिले आहे. जान्हवीच्या अभिनयाची एक वेगळी ओळख निर्माण होत असून ती श्रीदेवीचे अनुकरण का करेल, असेही त्यांनी म्हटले.
‘जान्हवी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. अभिनेत्री म्हणून श्रीदेवीची एक अनोखी छाप आहे. त्यामुळे जान्हवी तिचे अनुकरण का करणार? या क्षेत्रात टिकायचे असल्यास तिला तिच्या अभिनयाची स्वतंत्र ओळखच निर्माण करावी लागेल. ती अत्यंत मेहनती आणि हुशार मुलगी आहे, त्यामुळे तिचे स्थान ती निर्माण करेल असा माझा विश्वास आहे,’ असे ते म्हणाले.
जान्हवीला निर्माता- दिग्दर्शक करण जोहर लाँच करत असून शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’मध्ये ती झळकणार आहे. यामध्ये इशान खत्तरही मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे बरेच पोस्टर्स आतापर्यंत प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘सैराट’च्या आर्ची आणि परशाची जोडी तुफान गाजली होती. आता जान्हवी आणि इशान तीच जादू प्रेक्षकांवर करू शकतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.