आपल्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय जरी आज बच्चन कुटुंबाची सून असली तर एकेकाळी तिचे नाव सलमान खान आणि विवेक ओबेरॉयसोबत जोडले गेले होते हे सर्वांना चांगलेच माहित आहे. सलमान आणि ऐश्वर्याचे अफेअर १९९९ मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटापासून सुरु झाले आणि २००१ पर्यंत दोघांचे प्रेमसंबंध चालले. पण, सलमानच्या विचित्र वर्तणूकीमुळे दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आला. ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये मैत्री वाढली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या विश्वसौंदर्यवतीच्या ३० व्या वाढदिवशी विवेकने तिला ३० गिफ्ट दिल्याचे म्हटले जाते. सगळे चांगले सुरु असताना दोघांमध्ये नेमके असे काय झाले की त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला हे कोणालाच माहित नाही.
विवेकसोबत अफेअर असल्याचे ऐश्वर्याने कधीच उघडपणे कबूल केले नाही. मात्र प्रत्येक कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहिले जायचे. २००३ मध्ये विवेकने हॉटेलच्या खोलीत पत्रकार परिषद बोलावली. ऐश्वर्यासोबत मी असल्याने सलमानकडून जीवे मारण्याची धमकी येत असल्याची माहिती त्याने या पत्रकार परिषदेत दिली. ‘सलमानने दारूच्या नशेत मला ४१ वेळा फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली’, अशी धक्कादायक माहिती त्याने दिली. या पत्रकार परिषदेनंतर ऐश्वर्याने विवेकपासून दूर जाणेच पसंत केले. कोणत्याही वादविवादात अडकू नये म्हणून तिने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. ऐश्वर्या त्याला दुर्लक्ष करू लागली आणि विवेकची वागणूक ही अत्यंत बालिश असल्याचेही तिने म्हटले.
वाचा : दीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार
ब्रेकअपनंतर एका मुलाखतीत विवेकने ऐश्वर्याला ‘प्लास्टिक ऐश’ असे म्हटले होते. इतकेच नाही तर ऐश्वर्याला ‘प्लास्टिक हृदय’ असून ती ‘प्लास्टिक हास्य’ देते अशीही टीका त्याने केली होती. काही वर्षांनंतर आपली चूक उमगताच कोरिओग्राफर फराह खानच्या एका ‘टॉक शो’दरम्यान विवेकने आपली चूक कबूल केली. ‘पत्रकार परिषद घेऊन मी खूप मोठी चूक केली आणि मला ते सर्व बोलायला पाहिजे नव्हते,’ असे त्याने सांगितले.