चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणावर आजवर बरीच वक्तव्यं केली गेली. काहींनी आवाज उठवला तर काहींनी असं काहीच घडत नसल्याचं सांगत विषय टाळला. कास्टिंग काऊचसारख्या घटना घडल्या तरी भविष्यात आपल्याला काम मिळेल का, सुरक्षेची हमी मिळेल का या भीतीने आरोपींची नावं उघड करण्यास महिला घाबरतात. अभिनेत्री रिचा चढ्ढानेही हाच मुद्दा उचलून धरला आहे. माझ्या सुरक्षेची हमी दिल्यास मी ‘त्या’चं नाव जाहीर करेन, अशी अट रिचाने घातली आहे.

‘आयुष्यभरासाठी वेतन, माझी आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची हमी, मला चित्रपट, टीव्ही किंवा जिथे हवं तिथे काम मिळू देण्याची हमी, माझं करिअर सध्या ज्याप्रकारे सुरू आहे, तसंच राहू देण्याची काळजी घेतली गेली तरंच मी त्याचं नाव सांगेन. फक्त मीच नाही, तर माझ्यासारख्या लाखो तरुणी नावं उघड करतील. पण ही हमी कोण देणार?,’ असा प्रश्न रिचाने उपस्थित केला.

वाचा : हृतिकसोबत काम करण्यासाठी तब्बल १५ हजार लोकांनी दिलं ऑडिशन

‘एखादा पाऊल उचलल्यास लगेच विरोध होऊ लागतो. इंडस्ट्रीची ही विचारसरणी, ही रचना बदलायला हवी. अभिनेत्यांच्या बाबतीत असं घडताना दिसत नाही,’ असंही ती म्हणाली. लैंगिक शोषणाची घटना जेव्हा एखादी व्यक्ती सांगते तेव्हा लगेच तिला आरोपीचं नाव वगैरे विचारलं जातं. पण ती ज्या भीतीला सामोरं जात असते त्याचा कोणीच विचार करत नसल्याची खंत रिचाने व्यक्त केली.