विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस भाऊबीजेनिमित्त पोस्ट केलेल्या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे सांगत आपण पुन्हा नवीन कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असं म्हटलं आहे. तिला जगू द्या या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. आता याच पोस्टवरील ट्विटला रिप्लाय करत अमृता यांनी या गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले असून लवकरच मी नवीन कलाकृती घेऊन येईन असंही म्हटलं आहे.

अमृता यांनी आपलं हे गाणं प्रत्येक भाऊरायाला समर्पित केलं असल्याचं म्हटलं होतं. “आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे.. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या” असं म्हणत त्यांनी त्यांचं नव्या गाण्याचा व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाल्याचे सांगत अमृता यांनी सर्वांचे आभार मानलेत. “महिलांवर आधारित तिला जगू द्या या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांमध्ये या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन लवकरच मी पुन्हा येईन,” असं अमृता यांनी ट्विट केलं आहे.

काय आहे गाणं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं स्त्रियांना समर्पित केलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओत अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे. तसंच स्त्रिया या कशाप्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आहेत ते दाखवून दिलं आहे. स्त्री भ्रूण हत्या होतात, स्त्रियांना नाकारलं जातं, त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जातं, त्यांच्यावर अत्याचार होतात हे सगळं टाळण्याचं आवाहन अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्यातून केलं आहे. समाज जागृतीच्या दृष्टीने त्यांनी त्यांचं नवं गाणं समोर आणलं आहे.