बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेली नोटीस हृतिकने मागे घ्यावी नाहीतर त्याने कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहावे, असा निर्वाणीचा इशारा कंगनाच्या वकीलांकडून हृतिकला देण्यात आला आहे. याशिवाय, हृतिक या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील कंगनाने केला आहे.

दरम्यान, हृतिकने पाठवलेली नोटीस त्याने मागे घेतल्यास या प्रकरणाला पूर्णविराम देण्याची तयारी कंगनाने दर्शविली असल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले. कंगनाने मध्यंतरी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ह्रतिकचा उल्लेख सिली (मुर्ख) एक्स असा केला होता. या बदनामीकारक उल्लेखाबद्दल कंगनाने बिनशर्त माफी मागावी, यासाठी ह्रतिककडून गेल्या महिन्यात कंगनाला नोटीस पाठविण्यात आली होती. कंगनानेही या नोटीसीला जशास तसे उत्तर दिले होते. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी पाठविलेल्या नोटीसमध्ये माझ्या अशिलाने ‘सिली एक्स’चा उल्लेख करताना कुठेही ह्रतिक रोशनचे नाव घेतले नसल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापही हृतिककडून नोटीस मागे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस आणखी चिघळत चालले आहे.

Story img Loader