तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त किती इडल्या खाऊ शकता? साधारणपणे १०-१५ इडल्या असं उत्तर मिळेल. मात्र, एका वेळी तब्बल २०० इडल्या खाण्याचा अंदाज तुम्ही लावू शकता का? बॉलिवूड सेलिब्रिटींना आपल्या तालावर नाचवणारा कोरिओग्राफर गणेश आचार्यचा हा मजेशीर किस्सा आहे. आज जागतिक इडली दिनानिमित्त आम्ही तुम्हाला हा गमतीशीर किस्सा सांगणार आहोत.
गणेश आचार्यच्या लहानपणीचा हा किस्सा त्याच्या बहिणीनेच एका कार्यक्रमात सांगितला. ‘गणेशला लहानपणापासूनच खाण्याची प्रचंड आवड होती. एकदा त्याच्या एका मित्राने त्याला जास्तीत जास्त इडल्या खाण्याचं आव्हान दिलं होतं. गणेशने हे आव्हान हसत हसत स्विकारलं आणि एकामागोमाग एक अशा २०० इडल्या त्याने फस्त केल्या. गणेशने खाल्लेल्या इडल्यांचा आकडा पाहून त्याचा मित्रसुद्धा अचंबित झाला. कारण तो फक्त १२ इडल्याच खाऊ शकला होता. अशाप्रकारे अगदी सहजतेने गणेशने ती स्पर्धा जिंकली. त्याच्यासाठी ते काही फार मोठं आव्हान नव्हतं. उलट तो त्याचा दिवसभराचा नाश्ता होता,’ असं त्याच्या बहिणीने सांगितलं. हा किस्सा ऐकून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्काच बसला.
वाचा : ..जेव्हा नेटकरी ‘दबंग’ खानला फैलावर घेतात
२०१५ मध्ये गणेशचं वजन २०० किलोंवर गेलं होतं. पण वर्षभराच्या अथक प्रयत्नांनंतर त्याने ८५ किलो वजन घटवलं आहे. ‘माझं खाण्याचं प्रमाण आता खूप कमी झालं आहे. ८५ किलो वजन घटवणं ही काही सोपी गोष्ट नाही. अनेकदा तर मला काहीच न खाता राहावं लागत होतं,’ असं त्याने या कार्यक्रमात सांगितलं.