येत्या रविवारी म्हणजेच २६ नोव्हेंबरला टेलिव्हिजनवर ‘इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्स’ (ITA) प्रसारित होणार आहे. ‘कलर्स’ वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याचे काही प्रोमोसुद्धा पोस्ट केले आहेत. टेलिव्हिजन कलाकारांची धमाल मस्ती आणि त्यांचे परफॉर्मन्स या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळतीलच, पण त्याचसोबत काही विनोदी कलाकारांनी केलेली नक्कल तुम्हाला पोटधरून हसायला भाग पाडेल, यात काही शंका नाही. त्याचंच एक छोटं उदाहरण एका प्रोमोमध्ये पाहायला मिळालं, जेव्हा अली असगरने एकता कपूरची हुबेहूब नक्कल केली.

अलीची नक्कल पाहून एकतालाही हसू अनावर झालं. अलीने केलेल्या नकलेवर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, ‘जर तू माझ्या शोमध्ये असतास तर मी तुला काढून टाकलं असतं.’ अर्थात एकताने हे विनोदाने म्हटलं. पुरस्कार सोहळ्यात एकताच्या शेजारी बसलेल्या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणीसुद्धा अलीने केलेल्या नकलेवर खळखळून हसल्या.

‘आयटा अवॉर्ड्स’मध्ये अली असगर आणि मनिष पॉल सूत्रसंचालन करताना पाहायला मिळतील. एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या मालिकेतून अली प्रसिद्धीच्या झोतात आला. कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये त्याने साकारलेल्या कपिलच्या आजीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.