ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. १९५५ मध्ये त्यांनी ‘वेडी माणसं’ या एकांकीकेपासून लेखनाचा श्रीगणेशा केला होता. त्यावेळी ते अवघे १६ वर्षांचे होते. ती एकांकीका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती.
गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील सेव्हेन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा’ आणि मतकरी यांची काही अन्य नाटकं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तसंच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या लहान मुलांच्या, तसंच ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमीवर आपली छाप सोडली. गूढकथा हा कथाप्रकारही त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला. आतापर्यंत त्यांनी मोठ्यांसाठी ७० तर लहान मुलांसाठी २२ नाटकांचं लेखन केलं आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका लोकांच्या अद्यापही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या ‘इन्वेस्टमेन्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.
‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका लोकांच्या अद्यापही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या ‘इन्वेस्टमेन्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. २०१८ या वर्षासाठी रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला होता. रत्नाकर मतकरी यांनी बाल साहित्यात लिहिलेल्या कथा आणि गोष्टी प्रचंड गाजल्या. बालमनावर एक वेगळाच संस्कार करणाऱ्या या कथा होत्या, अलबत्या गलबत्या हे नाटक आणि त्यातली चेटकिण आणि मधुमंजिरी ही पात्रे अजूनही बालगोपाळांच्या लक्षात आहेत. सध्या हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे.
रत्नाकर मतकरी यांचे बाल साहित्य
अचाटगावची अफाट मावशी
अलबत्या गलबत्या
गाऊ गाणे गमतीचे (बालगीते)
चटकदार
चमत्कार झालाच पाहिजे
यक्षनंदन
राक्षसराज जिंदाबाद
शाबास लाकड्या
सरदार फाकडोजी वाकडे