क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून संपूर्ण भारतात क्रिकेटमय वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य चाहत्यासोबतच विविध क्षेत्रातील सेलीब्रिटीही क्रिकेट सामन्यांचा मनमुराद आनंद लुटत आहेत. ही मंडळी खेळाचा आनंद घेत आहेतच, शिवाय समाजमाध्यमांवरही जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. अशाच क्रिकेटमय वातावरणात अभिनेता रणवीर सिंहने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

१९८३ मधील क्रिकेट विश्वविजेत्या भारतीय संघावर आधारित आगामी चित्रपट ८३च्या प्रमोशन निमित्ताने रणवीर सिंह भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी इंग्लंडला गेला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. भारताने मिळवलेल्या विजयाच्या आनंदात रणवीर सिंहने क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सोबत काढलेला एक फोटो ट्विट केला. या ट्विटच्या खाली त्याने ‘ईट स्लीप डॉमिनेट रिपीट’ असे कॅप्शन दिले. या ट्विटमुळे रणवीर सिंहला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

रणवीरने केलेल्या ट्विटवर पॉल हॅमन याने आक्षेप दर्शवला आहे. पॉल हॅमन हा WWE सुपरस्टार ब्रॉक लेसनरचा वकिल आहे. ब्रॉक लेसनर याने WWE रेसलमेनियामध्ये सुपरस्टार अंडरटेकरला हरवले होते. दरम्यान आपल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने ‘ईट स्लीप डॉमिनेट रिपीट’ असा कोट वापरण्यास सुरुवात केली. या कोटवर माझा कायदेशीर हक्क असल्याचा व तशी कायदेशीर नोंदणी केल्याचा त्यानं दावा केला आहे. हा कोट परवानगी न घेता रणवीरनं वापरल्याच्या आरोपाखाली त्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या आधी असाच काहीसा प्रकार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंहच्या बाबतीतही घडला होता. धोनीने ‘इट स्लीप फिनिश गेम रिपिट’ असे ट्विट केले होते. या ट्विटवरही पॉल हॅमनने आक्षेप दर्शवला होता.

पॉल हॅमननं ट्विटरच्या माध्यमातून ही बाब सर्वांच्या निदर्शनास आणलेली असून अद्याप तरी रणवीर किंवा त्याच्या वकिलांनी काही प्रतिवाद केलेला नाही.