बॉलिवूड आणि वादविवाद हे समीकरण नाकारता येत नाही. सेलिब्रिटींनी एकमेकांवर केलेली टीका, चित्रपटांवरून झालेले वाद, सोशल मीडियावर ट्रोल अशा बऱ्याच घटना या सरत्या वर्षात घडल्या. जाणून घेऊयात हे वाद कोणते होते आणि कोणते सेलिब्रिटी या वादांमुळे चर्चेत राहिले?
१. ‘पद्मावती’ : संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत राहिला आहे. या चित्रपटाला राजपूत संघटनांचा तीव्र विरोध आहे. शूटिंगदरम्यान राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर गोंधळदेखील घातला होता. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट निर्मिती केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. करणी सेनेकडून भन्साळी आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता पुढे ढकलण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून आता प्रदर्शनाचा अंतिम निर्णय सेन्सॉर बोर्डाकडे आहे.
२. बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून करण जोहर आणि कंगनामध्ये वाद : बॉलिवूडमधील घराणेशाही हा मुद्दा या वर्षात जोरदार गाजला. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात गेलेल्या अभिनेत्री कंगना रणौतने करण जोहरवर घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. इतकेच नाही तर घराणेशाहीचा झेंडा मिरवणाऱ्यांमध्ये करणचाच पुढाकार असून तो ‘मुव्ही माफिया’ आहे असेही तिने म्हटले होते. ‘आयफा २०१७’ पुरस्कार सोहळ्यातही करण, सैफ अली खान आणि वरूण धवनने कंगनाची थट्टा केली होती. घराणेशाहीवर बॉलिवूडच्या कलाकारांनीही त्यांची मते मांडली. यात काहींनी कंगनाची बाजू घेतली तर काहींनी करणची.
३. हृतिक रोशन- कंगना रणौत वाद : अभिनेत्री कंगना रणौत आणखी एका कारणामुळे चर्चेत आली. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ कार्यक्रमात कार्यक्रमादरम्यान कंगनाने तिच्या आणि हृतिक रोशनच्या नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्यामुळे अनेकजण थक्क झाले. हा वाद नंतर इतका वाढला की हृतिकच्या बाजूने बरेच बॉलिवूड कलाकार उभे राहिले.
“https://loksatta.com/manoranjan-news/year-end-2017-special-most-searched-female-celebrities-2017-sunny-leone-tops-yahoo-india-list-priyanka-chopra-and-aishwarya-rai-follow-1597190/”>वाचा : Year End 2017 Special : प्रियांका, ऐश्वर्याला मागे टाकत सनीच ठरली बहुचर्चित सेलिब्रिटी
४. ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट वगळल्याचा वाद : ४८ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात पार पडला. मात्र हा महोत्सव बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिला. दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ हा चित्रपट महोत्सवातून वगळण्यात आलेला. ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे दोन चित्रपट वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने महोत्सवाच्या परीक्षकांना पूर्वसूचना न देता घेतला होता. या वादावरून मराठी दिग्दर्शक, कलाकार एकवटले होते.
५. अक्षय कुमार- मल्लिका दुआ वाद : ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोमध्ये परीक्षक म्हणून अभिनेता अक्षय कुमारला बसवलं आणि याच शोमध्ये त्याने सहपरीक्षक मल्लिका दुआसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे वाद निर्माण झाला. सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून बरीच चर्चा झाली. ट्विंकलने या वादात अक्षयची बाजू घेतली असता नंतर तिच्यावरही टीका झाली. त्यामुळे अखेर माघार घेत ट्विंकलने माफी मागत हे प्रकरण संपवण्याची विनंती केली.
६. फेअरनेस क्रीमची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांवर अभय देओलची टीका : अभिनेता अभय देओल याने फेसबुकवरील पोस्टमध्ये फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या शाहरूख खान, दीपिका पदुकोण, शाहीद कपूर, विद्या बालन आणि जॉन अब्राहम यांची खिल्ली उडविली होती. अभयने प्रत्येक कलाकारांच्या जाहिरातीसह फोटो पोस्ट करत त्यावर टिप्पणी केली होती. त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.
७. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ : अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित हा चित्रपट सेन्सॉर बोर्डामुळे अडचणीत आलेला. सीबीएफसीचे प्रमाणपत्र न देण्याच्या निर्णयाविरोधात सिनेमाची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव आणि निर्माते प्रकाश झा यांनी एफसीएटीकडे अपील केले होते. चित्रपटात देहविक्री करणाऱ्यांसाठी ज्या शब्दांचा वापर करण्यात आला त्या शब्दांना म्यूट करण्याचे आदेश ट्राब्यूनलने दिले होते. त्यानंतरच चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आले होते. सोशल मीडियावर चित्रपटाच्या समर्थनार्थ #LipstickRebellion ‘लिपस्टिक रिबेलियन’ हा हॅशटॅगसुद्धा ट्रेण्ड झाला होता.
८. रणबीर कपूर- माहिरा खान फोटो वाद : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ असलेला अभिनेता रणबीर कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. रणबीर आणि माहिराचे न्यूयॉर्कमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका हॉटेलबाहेर हे दोघे धूम्रपान करत असल्याचे हे फोटो होते. विशेष म्हणजे या फोटोंमुळे सोशल मीडियावर माहिरा खानवर जोरदार टीका झाली होती. रणबीरने माहिराची बाजू घेत तिच्याविषयीच्या नकारात्मक चर्चा थांबवण्याची विनंती त्याने केली होती.
९. अक्षय कुमारला ‘रुस्तम’ चित्रपटासाठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावरून वाद : अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, तेव्हापासून या निर्णयाचा विरोध केला जात होता. प्रियदर्शन यांच्या ज्युरी टीमने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली होती. यावेळी अक्षयला ‘रुस्तम’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला असल्याचे जाहीर केले होते. अक्षयला मिळालेल्या या पुरस्कारावर सोशल मीडियावर खूप टीका झाली. काही लोकांना आमिरला ‘दंगल’ सिनेमासाठी पुरस्कार मिळावा असे वाटत होते. तर काहींना अक्षय, प्रियदर्शनचा खूप चांगला मित्र आहे म्हणून त्याला हा पुरस्कार मिळाला असे वाटले. या प्रकरणावर अखेर अक्षयनेही विरोधकांना जशास तसे उत्तर दिले होते. माझ्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण यावरही कोणाला आक्षेप असेल तर हा पुरस्कार परत घ्यावा, असे तो म्हणाला होता.
१०. सोनू निगम : गायक सोनू निगम त्याच्या गाण्यांमुळे नाही तर एका ट्विटमुळे चांगलाच चर्चेत आला होता. कारण त्याच्या एका ट्विटने धार्मिक भावना दुखावल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती. ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या या धार्मिक रुढी कधी थांबणार?’ असे ट्विट त्याने केले होते. सोनूच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी त्याला धारेवर धरत त्याचा चांगलाच समाचार घेतला होता.