प्रत्येक वर्षाचे ज्या उत्साहात स्वागत केले जाते, त्याच वर्षाच्या अखेरीस काही गोष्टींचा हमखास आढावा घेतला जातो. कोणत्या नव्या गोष्टींमुळे अमुक एक वर्ष गाजले यासोबतच कोण आपल्या आयुष्यात आनंदाची बरसात करुन गेले इथंपर्यंत प्रत्येक गोष्टीवर धावती नजर टाकतच सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. या साऱ्यामध्ये एक गोष्ट अनेकांच्याच मनाला चटका लावून जाते, ती म्हणजे आपल्यातून निघून गेलेल्या काही मंडळींची आठवण. २०१७ मध्येही काही दिग्गज कलावंत या कलाविश्वातून आणि चाहत्यांच्या गराड्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने या कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली. पण, तरीही अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून ही कलाकार मंडळी कायमच रसिकांच्या स्मरणात राहतील यात शंकाच नाही. यंदाच्या वर्षात प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या काही कलाकार मंडळींच्या आठवणींना आज आपण पुन्हा उजाळा देणार आहोत.

शशी कपूर
कपूर कुटुंबातील देखण्या चेहऱ्याचे आणि कलाविश्वाप्रती तत्परतेने झटणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे ४ डिसेंबरला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. १९४० पासून त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत ११६ चित्रपटांमध्ये काम केले असून त्यातील ६१ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ६० आणि ७० च्या दशकांत त्यांनी ‘जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मिली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार’, ‘कभी-कभी’ आणि ‘फकिरा’ या सुपरहिट सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या होत्या.

गिरिजा देवी
सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांनीही २३ ऑक्टोबरला जगाच निरोप घेतला. बनारस घराण्याच्या शास्त्रीय गायिका असणाऱ्या गिरिजा देवी शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी ‘ठुमरी’ या गाण्याच्या प्रकारात त्या पारंगत होत्या. आपल्या याच गुणवैशिष्ट्यामुळे त्या ‘ठुमरीची राणी’ म्हणूनही ओळखल्या जात होत्या. गिरिजा देवी यांना १९७२ मध्ये पद्मश्री किताबाने त्यानंतर १९८९ मध्ये पद्मभूषणने तर २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरवण्यात आले होते.

राम मुखर्जी
२२ ऑक्टोबरला अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी यांचे निधन झाले.
चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि निर्मिती क्षेत्रात मुखर्जी यांनी आपली छाप सोडली होती. ‘हम हिंदुस्तानी’, ‘लीडर’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांना कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. चित्रपट निर्माते शशाधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होते. ‘फिल्मालय स्टुडिओज’शी राम मुखर्जी यांचं अगदी जवळचे नाते होतं.

टॉम अल्टर
अमेरिकन वंशाचे भारतीय अभिनेते टॉम अल्टर यांनी २९ सप्टेंबरला जगाचा निरोप घेतला. १९७६ मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘चरस’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘शतरंज के खिलाडी’, ‘गांधी’, ‘क्रांती’, ‘बोस : द अनफरगॉटन हिरो’ आणि ‘वीर झारा’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच, अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ‘जुगलबंदी’, ‘भारत एक खोज’, ‘घुटन’, ‘शक्तीमान’, ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘यहाँ के हम सिकंदर’ यासारख्या मालिकांमधूनही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली.

सीताराम पांचाल
बॉलिवूड अभिनेता सीताराम पांचाल यांच्या निधनाने अनेकांच्याच हृदयाला चटका लावला. साधारण वर्षभरापासून ते मूत्रपिंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त होते. सीताराम यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘द लिजंड ऑफ भगत सिंग’ चित्रपटात त्यांनी लाला लाजपत राय यांची भूमिका साकारली होती. ‘पान सिंग तोमर’, ‘पीपली लाइव्ह’, ‘जॉली एलएलबी २’, ‘स्लमडॉग मिलिनेयर’, ‘बँडिट क्वीन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती.

इंदर कुमार
‘तिरछी टोपीवाले’, ‘कही प्यार ना हो जाये’ ‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेता इंदर कुमारच्या जाण्याने अनेकांना धक्काच बसला. वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी इंदरचे निधन झाले. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये दूरियां’ या चित्रपटानंतर इंदर चित्रपटसृष्टीपासून दुरावला होता. इंदरने आजवर विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ९० च्या दशकात त्याने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली होती. दबंग अभिनेता सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ चित्रपटातही त्याने स्क्रीन शेअर केली होती. त्यासोबतच ‘तुमको ना भूल पायेंगे’, ‘खिलाडीओ का खिलाडी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकाही विशेष गाजल्या होत्या. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत त्याने साकारलेल्या ‘मिहिर विरानी’ या भूमिकेलाही प्रेक्षकांची दाद मिळाली होती.

उमा भेंडे
‘आकाशगंगा’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘भालू’ आणि ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांनी १९ जुलैला अखेरचा श्वास घेतला. ‘हवास तू…’, ‘गुडिया हमसे रुठेगी’ या गाण्यांसाठीही त्या ओळखल्या जातात. उमाताईंवर चित्रीत करण्यात आलेली ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यांनी १९६० मध्ये ‘आकाशगंगा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मराठीसह त्यांनी तेलगू आणि तमिळ चित्रपटांतही अनेक भूमिका साकारल्या होत्या.

सुमिता सन्याल
बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री सुमिता सन्याल यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या असून त्यात बंगाली चित्रपटांचं प्रमाण जास्त आहे. ‘कुहेली’, ‘आशिर्वाद’, ‘गुड्डी’, ‘मेरे अपने’ या चित्रपटांतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. हिंदी चित्रपट आणि नाटकांसोबतच मालिकांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या.

मधुकर तोरडमल
२ जुलैला ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांनी आयुष्याच्या व्यासपीठावरुन एक्झिट घेतली. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.

रिमा
चित्रपटसृष्टीतील ‘ग्लॅमरस माँ’ अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांनाच धक्का बसला होता. रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिका अशा सगळीकडे समर्थ अभिनयाने आणि सहज वावराने आपली छाप सोडली होती. ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि करारी अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या रिमा बऱ्याच वर्षांनंतर टेलिव्हिजनवर परतल्या होत्या. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमधूनही आघाडीच्या कलाकारांबरोबर त्यांनी काम केले होते. टेलीव्हिजनवरही हिंदी आणि मराठी दोन्हीकडे त्यांचा सारखाच दबदबा होता.

विनोद खन्ना
हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘हॅण्डसम’ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद खन्ना यांनी २७ एप्रिलला या जगाचा निरोप घेतला. १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. १९७१ मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमांमधून आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते.

तारक मेहता
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण, या साऱ्याचा पाया रचला होता ते म्हणजे विनोदी लेखक, नाटककार तारक मेहता यांनी. १ मार्चला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तारक मेहता यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘दुनियाने उंधा चष्मा’ या सदरासाठी आणि अनोख्या लेखनशैलीसाठी तारक मेहता ओळखले जायचे. त्यांच्या लेखनामध्ये नेहमीच नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील चंपकलाल गडा, जेठाभाई, दयाबेन यांसारख्या पात्रांना अजरामर करण्यामागे तारक मेहता यांच्या लेखणीचा मोठा हात आहे. गुजराती रंगभूमीसाठी तारक मेहता यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. विनोदी लेखनशैलीच्या मदतीने तारक मेहता यांच्या लेखनाने अनेकांचीच मने जिंकली. त्यांचे ‘नवूं आकाश नवी धरती’ आणि ‘कोथळामांथी खिलाडी’ ही गुजराती भाषेतील पुस्तकेही खूप गाजली.