मुस्लिम असल्याने मुंबई राहण्यासाठी घर मिळत नसल्याची खंत टेलिव्हिजन अभिनेत्री शिरीन मिर्झाने व्यक्त केली आहे. एकता कपूरच्या ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत दिव्यांका त्रिपाठीची नणंद सिमीची भूमिका ती साकारत आहे. मुस्लिम, अविवाहित आणि अभिनेत्री असल्याचं कारण देत मला घर भाड्याने देत नसल्याचा संताप तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

शिरीनने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे. अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आल्यानंतर काढलेला पहिला फोटो तिने पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच तिने तिची व्यथा मांडली आहे. ‘मी मुंबई घर घेण्यास पात्र नाही कारण मी MBA आहे. MBA म्हणजेच मुस्लिम, बॅचलर आणि अॅक्टर. या तीन कारणांमुळे मला मुंबईत राहण्यासाठी घर मिळत नाहीये. मला दारू, सिगारेट यांसारखं कोणतंच व्यसन नाही. माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तरीही लोक माझ्या चारित्र्यावर संशय कसा निर्माण करू शकतात? मी एखाद्या ब्रोकरला फोन केला तर अविवाहित असल्याचं कळताच ते घरभाडं वाढवून सांगतात. तर दुसरा व्यक्ती मी हिंदू आहे की मुस्लिम हे विचारतो. धर्माचा, अभिनेत्री असण्याचा किंवा विवाहित नसल्याचा घर भाड्याने देण्याशी काय संबंध आहे? मुंबईत येऊन मला आठ वर्षं झाली तरीही माझा संघर्ष सुरू आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की मी या शहराची आहे की नाही?,’ असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं.

वाचा : ..म्हणून चाहते माधुरीच्या नृत्याला मुकणार 

‘ये है मोहब्बते’ या मालिकेतूनच शिरीनला खरी ओळख मिळाली. शिरीनच्या या पोस्टनंतर अनेकांनीच तिला साथ दिली आहे. सध्या तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून याबद्दल राग व्यक्त केला आहे.