स्वातंत्र्यवीरांना आजवर कधीच अशी मानवंदना दिली गेली नसेल अशी मानवंदना आपल्या हवाई दलाने आज दिली आहे अशी प्रतिक्रिया अभिनेते योगेश सोमण यांनी दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबद्दल योगेश सोमण यांनी भारतीय हवाई दलाचं कौतुक केलं. फेसबुकच्या माध्यमातून योगेश सोमण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी ‘उरी’ चित्रपटातील ‘ये नया हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेंगा भी’ हा डायलॉगही बोलून दाखवला. सर्जिकल स्ट्राइकवर आधारित ‘उरी’ चित्रपटात योगेश सोमण यांनी तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भूमिका निभावली होती.

योगेश सोमण यांनी फेसबुक व्हिडीओत म्हटलं आहे की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्यवीरांना आजवर कधीच अशी दिली गेली नसेल अशी मानवंदना आपल्या हवाई दलाने आज दिली आहे. आज पहाटेच्या सुमारास हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करुन दहशतवादी तळ आणि २०० च्या आसपास दहशतवाद्यांचा खात्मा केला. याची सत्यता, खातरजमा, पहिली माहिती पाकिस्तानकडूनच मिळाली’.

पुढे बोलताना योगेश सोमण यांनी पुण्यात कर्णबधीर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा उल्लेख केला. पुणे पोलिसांनी हवाई दलाने केलेल्या कारवाईतून काहीतरी शिकावं असा टोलाही लगावला. ‘पुण्यातील पोलीस दलानं यामधून काहीतरी शिकावं. आपल्याच कर्णबधीर देशबांधवांवर लाठीहल्ला करण्यापेक्षा समाजातील खरे शत्रू ओळखून त्यांना शासन करावं, त्यांचा बंदोबस्त करावा’, असं मत योगेश सोमण यांनी व्यक्त केलं आहे.