बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूरची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘रेस ३’ बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत आहे. यासोबतच आणखी एका कारणामुळे अनिल कपूर यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. दहा दिवसांच्या परदेश वारीनंतर त्यांची पत्नी सुनीता घरी परतत असल्याने अनिल कपूर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हाच आनंद सोशल मीडियावर शेअर करताना त्यांची मुलगी रिया कपूरने चांगलीच खिल्ली उडवली आहे.

पत्नी घरी परत येण्याच्या आनंदात तिला मेसेज करतानाचा अनिल कपूर यांचा फोटो त्यांच्या एका मित्राने काढला. हाच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अनिल कपूर यांनी पत्नीसाठीचं प्रेम व्यक्त केलं. ‘दहा दिवसांच्या ऑस्ट्रीया ट्रीपनंतर माझं प्रेम, माझी पत्नी सुनीता आज घरी परतत आहे. तिच्याशिवाय हे दहा दिवस मी कसे व्यतित केले हे मलाच माहित आहे,’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं. यावर आधी त्यांचा जावई आनंद अहुजाने स्माईली पोस्ट करत कमेंट केली. त्यानंतर मुलगी रियाने केलेल्या कमेंटनं अनेकांचं लक्ष वेधलं.

वाचा : सुहानासोबतच्या फोटोमधील ‘तो’ आहे तरी कोण? 

‘अतिशयोक्तीची व्याख्या म्हणजे तुम्ही आहात,’ असं म्हणत रियाने वडिलांची टेर खेचली. त्यावर सुनीता कपूर यांनीही उत्तर दिलं की, ‘तुला अद्वितीय असं म्हणायचं आहे का?’ यावर नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं.