उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीयस्तरावर पाकिस्तान कोंडीत सापडताना दिसत आहे. दहशतवादाबद्दल पाकिस्तानच्या भूमिकेवर अनेक देशांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. त्या पूर्वीच भारतातील माध्यम क्षेत्रात आघाडीवर असलेला झी समुह पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणण्याच्या विचारात आहे. झी समुहाचे प्रमुख खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी स्वत: ट्विटरवरून शनिवारी सकाळी ही माहिती दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत भारतविरोधात घेतलेली भूमिका दुर्दैवी असल्याचे मत सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले आहे. सुभाष चंद्रा यांच्या भुमिकेचे सोशल मीडियावर स्वागत केले जात आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी झी समुहाने पाकिस्तानी कथानक व कलाकार असलेली झी जिंदगी नावाची विशेष वाहिनी सुरू केली आहे. या वाहिनीला भारतातून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय. परंतु पाकिस्तानचे दहशतवादाला समर्थन व जम्मू काश्मीरबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मांडलेली भूमिका पटणारी नसल्याचे सुभाष चंद्रा यांनी म्हटले आहे. त्यामुळे झी जिंदगी व समुहातील इतर वाहिन्यांमध्ये काम करत असलेले पाकिस्तानी कलाकार व पाकिस्तानी कार्यक्रम बंद करण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी टविटरवर म्हटले आहे. सुभाष चंद्रा यांनी हे टविट करताच त्यांना अनेकांनी पाठिंबा दर्शवत त्यांच्या भुमिकेचे स्वागत केले आहे.
याच वाहिनीवरील जिंदगी गुलजार है या मालिकेच्या माध्यमातूनच पाकिस्तानी अभिनेता फवाद खान भारतीयांच्या घराघरापर्यंत पोहोचला होता. बिन तेरे, फतेमागूल, फेरिहा, अगर तुम साथ हू, मैं हारी पिया यासह विविध मालिकांमध्ये पाकिस्तानी कलाकार काम करत आहेत. झी समुहाने हा निर्णय घेतला तर पाकिस्तानच्या कलाकारांना हा मोठा धक्का असेल. देशातील इतर माध्यम समुह याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचेच लक्ष आहे.