झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. आता या मालिकेच्या जागी एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘ती परत आलीये’ असे आहे. या मालिकेचा प्रोमो यापूर्वी सोशल मीडियावर चर्चेत होता. पण मालिकेतील ‘ती’ म्हणजे नक्की कोण? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.

नुकताच मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोममध्ये एक चित्तथरारक चेहरा आणि अंगावर भीतीने काटा आणणारं बॅकग्राउंड म्यूझिक प्रेक्षकांना पाहायला मिळाले. प्रोमो नंतर एकच खळबळ उडाली ती नक्की कोण आहे? हा भयानक चेहरा आहे कि मुखवटा? ती परत आलीये असं विजय कदम आधीच्या प्रोमो मध्ये म्हणताना दिसले आता तिची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली.

ती कोण आहे याबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, “तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ती कोण आहे हे मला माहिती आहे पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.” विजय कदम व्यतिरिक्त या मालिकेतील कलाकारांची फौज कोण आहे? याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. ही मालिका १६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader