ते आले.. त्यांनी पाहिलं.. त्यांनी हसवलं.. कधी गुदगुल्या करत.. तर कधी अगदी पोट दुखेपर्यंत.. अभिनयानं प्रेक्षकांना भावूक करणं सोपं नसतं. परंतु अशक्यही नाही. मात्र आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य आणणं निश्चितच आव्हानात्मक आहे. आणि ज्याला हे जमलं तोच खरा विनोदसम्राट.. असेच काही विनोदसम्राट आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला लाभले आहेत. ज्यांनी हास्याचा धबधबा कायम खळखळता ठेवला. प्रेक्षकांना काही काळ आपली दुःख विसरण्यास भाग पाडलं. स्वतःची ही दुःख विसरून हास्याची ही परंपरा कायम ठेवणाऱ्या या विनोदवीरांना झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्सतर्फे मनापासून सलाम केला जातो. यंदाही हा पुरस्कार सोहळा होत असून, तुम्हाला यात विनोदांची पर्वणीच पाहायला मिळणार आहे.

वाचा : VIDEO ‘गाववाल्यानू तुमचो आमच्यावर भरवसो नाय काय?’ सोनूच्या गाण्याचं मालवणी व्हर्जन

नुकताच हा सोहळा पार पाडला. या सोहळ्यात विनोदवीर, अभिनेते प्रियदर्शन जाधव आणि कुशाल बद्रीके यांनीही हास्याचे बार उडवून दिले. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘बाहुबली २’ चित्रपटामुळे सगळीकडे बाहुबली फिव्हर पहायला मिळत आहे. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीसुद्धा यात मागे नाही. यंदाच्या झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळ्यातही याचा प्रत्यय आला. अभिनेता प्रियदर्शन जाधवने बाहुबलीचा तर कुशल बद्रीकेने भल्लालदेवचा अवतार धारण करत केलेली खडाजंगी चांगलीच रंगली. एकमेकांना नामोहरम करण्यासाठी या दोघांनी कोणत्या नवनव्या चाली रचल्या हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. यात नेमकं काय घडलं? व कोणी कोणावर मात केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रविवार ३० जुलैला सायं. ६.३० वाजता प्रसारित होणाऱ्या झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्समध्ये पहायला मिळतील.

वाचा : …त्यांच्या भीतीमुळे शर्मिला टागोरचे बिकिनी पोस्टर एका रात्रीत उतरवण्यात आले होते