गोरखपूर येथील डॉ. काफिल खान यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत केलेला आरोप अलहाबाद उच्च न्यायालयानं रद्द केला. तसेच त्यांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता जिशान अय्युब याने प्रतिक्रिया दिली आहे. लड़ेंगे साथी, जीतेंगे साथी असं म्हणत त्याने कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे.

“कळत नाही काय प्रतिक्रिया देऊ. काफिल खान मुक्त झाल्याचा आनंद आहे. पण इतकं साधं सरळ प्रकरण ताणंल्याचं दु:ख देखील आहे. बराच काळ तुम्हाला तुरूंगात रहावं लागलं.” अशा आशयाचं ट्विट करुन जीशान अय्यूब याने कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा- डॉ. काफिल खान यांना तात्काळ सोडा; अलहाबाद उच्च न्यायालयाचे आदेश

डॉ. काफिल खान यांच्यावर सुधारित नागरिकत्व कायदा व एनआरसीविषयी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई केली होती. द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली एनएसए कायद्यातंर्गत कारवाई करत काफिल खान यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हापासून काफिल खान मथुरेतील तुरुंगात बंद आहेत.

काफिल खान यांच्या कैदेत ठेवण्याच्या कालावधीत काही दिवसांपूर्वीच वाढ करण्यात आली होती. ३ महिन्यांसाठी हा कालावधी वाढवण्यात आला होता. मागील सहा महिन्यांपासून ते मथुरा येथील तुरूंगात बंद आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कायदा १९८० मधील नियम ३(२) नुसार त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

न्यायालयानं कारवाई प्रकरणी टोचले कान

याचिकेवर निकाल देताना अलहाबाद उच्च न्यायालयानं कारवाई केल्याप्रकरणी प्रशासनाचे कान टोचले. अलिगढच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १३ फेब्रुवारी २०२० रोजी काढलेला आदेश बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर काफिल खान यांना बंदीवासात ठेवण्याच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णयही अवैध असल्याचं न्यायालयानं सांगितलं. त्याचबरोबर खान यांना तात्काळ तुरूंगातून मुक्त करण्यात यावं, असे आदेश दिले आहेत.