बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून जुन्या हिंदी चित्रपटांचे रिमेक करण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. काही दिग्दर्शक या ट्रेण्डच्या विरोधात आहेत तर काहीजण रिमेक काढून बक्कळ कमाई करत आहेत. अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची बहीण दिग्दर्शिका झोया अख्तर यांनाही एका क्लासिक चित्रपटाचा रिमेक काढण्याची इच्छा आहे.
वाचा : ..म्हणून कपिल तिच्या लग्नाला जाऊ शकला नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘हीर रांझा’ या क्लासिक चित्रपटाचा रिमेक काढून त्याला मॉर्डन टच देण्याचा विचार झोया करत आहे. भाऊ फरहानसोबत हा चित्रपट करण्यासाठी ती बरीच उत्सुक आहे. चित्रपटातील संवाद पूर्णपणे कवितांमध्ये असलेला ‘हीर रांझा’ हा एकमेव चित्रपट असल्याचे कळते. हे संवाद फरहानची सावत्र आई आणि अभिनेत्री शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी यांनी लिहिले होते. त्यामुळेच चित्रपटाचा रिमेक काढून ही भावंडे त्यांना श्रद्धांजली अर्पित करू इच्छितात. मात्र, फरहानचे हे स्वप्न पूर्ण होण्यात काही अडथळे येत आहेत.
‘हीर रांझा’ या १९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासिक चित्रपटाचे अधिकार प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांच्याकडे होते. चेतन आनंद यांच्या निधनानंतर हे अधिकार त्यांचा मुलगा केतन आनंद याच्याकडे आहेत. मात्र, चित्रपटाचे अधिकार कोणालाच देण्याची त्यांना इच्छा नाही. याविषयी चेतन म्हणाले की, त्यांनी स्वतः मला याविषयी काहीच विचारले नाही. मात्र, त्यांच्या कंपनीतील लोकांनी पाच महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क साधला होता. आतापर्यंत माझी फरहान, झोया किंवा त्यांचे वडील जावेद अख्तर यांच्याशी समोरासमोर कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे मी कोणतेही आढेवेढे न घेता चित्रपटाच्या रिमेकला सरळ नामंजूर केले.
वाचा : तडजोड करण्याच्या मागणीला अभिनेत्रीनं ‘असं’ दिलं उत्तर
सूत्रांच्या माहितीनुसार, केतन यांनी चित्रपटाच्या अधिकाराच्या बदल्यात प्रमाणाच्या बाहेर रक्कम मागितली होती. त्यांनी अधिकाराच्या मोबदल्यात १० कोटी रुपयांची मागणी केली होती. पण, फरहान – झोया केवळ एक कोटी रुपये देण्यास तयार होते. त्यामुळे केतन यांनी चित्रपटाचे अधिकार विकण्यास नकार दिल्याचे समजते. त्यांच्या मते या चित्रपटाचा रिमेक काढून ही भावंडे नंतर कोट्यवधी रुपये कमवतील. तसेच, त्यांना स्वतः ‘हीर रांझा’चा रिमेक काढण्याची इच्छा असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.