मराठी सिनेमा बदललाय का? अर्थातच याचे उत्तर होय असेच असेल. ज्या पद्धतीने सध्या मराठी सिनेमात आणि चित्रपटसृष्टीत बदल झाला आहे तो पाहता मराठी पाऊल पडते पुढे असेच म्हणावं लागेल. मागील दहा वर्षात तर मराठी चित्रपटसृष्टीत अमुलाग्र बदल झाला आहे. विशेष म्हणजे कधी काळी ‘क्या है मराठी सिनेमा मै’? असं नकारात्मक प्रश्न विचारणारे बॉलिवूड दिग्दर्शकांनी सुद्धा मराठी सिनेमांची दाखल घेतली. याचच उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचा ‘धडक’. नागराज मंजुळे यांचा सुपरहिट ठरलेल्या ‘सैराट’ या सिनेमाने संपूर्ण बॉलिवूडला वेड लावलं त्यामुळेच करण जोहरने या चित्रपटाचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून साकार झाला ‘धडक’. मात्र सैराटने जे प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं ते ‘धडक’ला जमलं नाही हेही तितकंच खरं. गेल्या १० वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे आणि त्याला एक नवी लकाकी मिळाली आहे.
काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक, विरंगुळा होईल अशा चित्रपटांची निर्मिती होत होती. कालांतराने या विषयांमध्ये बदल होऊ लागला. आजवर दुर्लक्षित असलेले विषय आणि परिघाबाहेरील विषय हाताळले जाऊ लागले. ‘वळू’ (२००८) , ‘ग्राभीचा पाऊस’ , ‘जोगवा’ , ‘हरीश्चन्दाची फक्टरी’ (२००९), ‘विहीर’ , ‘नटरंग’ (२०१०) अशा समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती झाली. परिणामी, अशा चित्रपटांच्या निर्मितीमुळे मराठी सिनेमा पाहण्याऱ्यांच्या संख्येत आता वाढत होताना दिसत आहे.
डिजीटल तंत्रज्ञानाच्या स्वीकार, नवी विचारशैली यामुळे मराठी चित्रपटाचे स्वरूप बदलले आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये सर्व परिचित असलेला ‘लो बजेट’ सिनेमा ही संकल्पना मराठीमध्येही रुजू लागली. ‘श्वास’ हा चित्रपट त्याचच उदाहरण. आजोबा आणि कॅन्सरग्रस्त नातू यांच्यावर आधारित हा ‘लो बजेट’ चित्रपट २००४ साली प्रचंड लोकप्रिय झाला होता.
‘श्वास’ प्रदर्शित झाल्यानंतर मराठी सिनेमाची खऱ्या अर्थाने दखल घेतली गेली. मराठी सिनेमातील नव्या प्रवाहातील प्रत्येक सिनेमा हा नवीन विचाराचा असला आणि नवीन प्रयोग करणारा असला तरी तो कथेच्या बाबतीत मात्र वेगळी दिशा शोधताना दिसतो. मराठी चित्रपटांमध्ये हळूहळू होत असलेले बदल नंतर वेगाने पुढे जाऊ लागले आणि कधीकाळी पडद्यामागे असलेले दृष्य समोर येऊ लागली. संस्कृती आणि रीतिरिवाज यांची शिकवण देणाऱ्या सिनेमात बदल झाले. बदलती जीवनशैली, नवीन आचारविचार आणि तरुणाईचा वाढत कल लक्षात घेऊन चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. मराठी अभिनेत्री हॉट आणि बोल्डसीन देऊ लागल्या. सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर या अभिनेत्रींनी मराठीमध्ये प्रथम बिकिनी सीन दिले आणि आता त्यांचाच पावलावर पाऊल ठेवत दीप्ती सती या नवोदित अभिनेत्रीनेही संजय जाधवच्या आगामी ‘लकी’ या चित्रपटात बिकिनी सीन दिले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट आता अरुणोदय होताना दिसत आहे.
मराठी सिनेमाच्या बदलत्या ट्रेंडमुळे बॉलिवूडने केवळ मराठी चित्रपटांची दाखल घेतली नाही तर मराठी संगीतकार, गीतकार यांचीही दखल घेतली. मराठी माणसांवर आपल्या आवाजाने आणि गीतांनी भूरळ घालणाऱ्या अजय-अतुल या भावांच्या जोडीचं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. या दोघांनी आतापर्यंत अनेक हिंदी सिनेमांमध्ये मोलाचं योगदान दिले आहे.
जसा मराठी कलावंत, संगीतकार यांचा मराठी ते हिंदी असा प्रवास सुरु झाला तसाच हिंदी मधील काही कलाकार, गायक, दिग्दर्शकदेखील मराठी सिनेमाकडे वळले. जेनेलिया डिसुझा या अभिनेत्रीने ‘माऊली’ आणि ‘लय भारी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करून मराठीत पाऊल ठेवलं. तर सुभाष घई यांची ‘मुक्ता आर्ट्स’ ही चित्रसंस्था मराठी चित्रपटनिर्मितीत उतरली आणि बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरली.
दरम्यान, मुंबईतील मराठी अस्मितेचा मुद्दा मांडणार ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ (२००९) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणार पहिला मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटाने तब्बल २२ कोटींचा गल्ला जमविला. तर ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या चित्रपटांनी देखील तुफान यश मिळवलं.
भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या पहिल्या चित्रपटाच्या मेकिंगवर परेश मोकाशी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आणि चित्रपटसृष्टीच्या उगमाची ओळख करून दिली. मराठी चित्रपटांच्या बदलत्या ट्रेंडमध्ये पौगंडावस्थेतील मुलांना घेऊन सिनेमा बनविण्याचा नवा ट्रेण्ड आला. २०१३ मध्ये ‘बालक पालक’ या चित्रपटात रवी जाधव यांनी मुळप्रवाहाला धरून नाजूक विषय सहजरित्या हाताळला. त्यामुळे एकेक वर्ष सरत असताना मराठी चित्रपटसृष्टी नवनवीन बदल होताना दिसत आहेत.