एखाद्या अभिनेत्यावर ‘परफेक्ट’ असल्याचा शिक्का बसला की तो जे काही करील त्यात त्याचं ‘परफेक्शन’ शोधण्याचा प्रयत्न केला जातो. बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून आमिर खानची ओळख असली तरी गेल्या काही वर्षांत अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक-गीतकार-गायक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभेलल्या फरहाननेही अभिनयाच्या बाबतीत आपण तेवढेच मेहनती आणि ‘परफेक्ट’ असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे त्याच्या हरएक नव्या चित्रपटाबरोबर तू या भूमिकेसाठी ‘किती मेहनत घेतलीस’ हा प्रश्न हमखास येतो. आगामी ‘शादी के साईड इफेक्ट्स’ चित्रपटासाठी थोडीथोडकी नव्हे तर १४ वर्षे मेहनत घेतली असल्याचे मिश्किल उत्तर फरहानने दिले आहे.
‘रॉक ऑन’ चित्रपटातली भूमिका असो किंवा ‘डॉन’चे दिग्दर्शन असो, प्रत्येक ठिकाणी फरहानचा अभ्यास एकदम पक्का असतो. ‘भाग मिल्खा भाग’मधील मिल्खा सिंगच्या भूमिकेसाठी त्याने जी जीवतोड मेहनत केली त्याला तर निर्मात्यांपासून अनेकांची दाद मिळाली. अगदी मिल्खा सिंग यांच्या पत्नीनेही क्षणभरासाठी का होईना फरहान आणि मिल्खा सिंग यांच्यात फरक करणे आपल्यालाही अवघड गेल्याचे सांगून त्याच्या भूमिकेला दाद दिली होती. त्यामुळे या चित्रपटानंतर आता तू या भूमिकेसाठी किती मेहनत घेतलीस हा प्रश्न फरहानसाठी परवलीचा झाला आहे.फरहान विद्या बालनबरोबर ‘शादी के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हरतऱ्हेच्या युक्त्या-प्रयुक्त्या लढविल्या जात आहेत. फरहानसारखी आपल्या भूमिकेबद्दल चोखंदळ आणि मेहनती असलेल्या विद्या बालनसोबत त्याची जोडी जमल्यामुळे चित्रपटाचा प्रसिद्धी कार्यक्रम ही धमाल बनली आहे. अशाच एका कार्यक्रमात आपल्या या परवलीच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘शादी के साईड इफेक्ट्स’ शोधण्यासाठी एक नव्हे दोन नव्हे गेली चौदा वर्षे मेहनत करीत आहोत असे मिश्किल उत्तर फरहानने दिले. फरहानचं लग्न होऊन चौदा वर्ष झालीत. तो आणि त्याची पत्नी अधुना अख्तर दोघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज आहेत. अधुना एक हेअरस्टायलिस्ट असून तिचा स्वत:चा सलून ब्रॅंड आहे. अख्तर दाम्पत्याला एक मुलगीही आहे त्यामुळे या चौदा वर्षांत त्याने शादी के सगळे साईड इफे क्ट्स अनुभवून झाले असतील यात शंका नाही. एवढी वर्षे वैवाहिक जीवनाची गाडी व्यवस्थित हाकत आपल्याला हव्या त्या क्षेत्रात भरारी घेणारा फरहान अख्तर हा निदान आजच्या पिढीतला तरी एकमेव कलंदर अभिनेता म्हणता येईल.

Story img Loader