अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या आगामी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर सध्या स्थगिती आहे. पण प्रमोशननिमित्त विवेक मुलाखती देत आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीनंतर १६ वर्षांपूर्वी झालेल्या सलमानसोबतचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

तुला जर सलमानला प्रश्न विचारण्याची संधी दिली तर तू काय विचारशील असा सवाल विवेकला या मुलाखतीत करण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, ‘तू माफ करण्यावर विश्वास करतोस का,’ असा प्रश्न विचारेन. विवेकच्या या प्रश्नामुळे पुन्हा एकदा सलमान आणि त्याच्यात १६ वर्षांपूर्वी झालेला वाद चर्चेत आला.

विवेकने २००३ मध्ये पत्रकार परिषद घेत सलमानवर काही आरोप केले होते. त्यानंतर विवेकच्या करिअरला उतरती कळा लागली असं म्हटलं जातं. या वादाशी सलमानचंही फार जुनं नातं आहे. बी-टाऊनमध्ये बऱ्याच लोकांसोबत सलमानचे वाद झाले. पण वेळेनुसार ते वाद मिटलेसुद्धा. विवेकसोबतचा वाद मात्र अजूनही कायम आहे. आता विवेकच्या या प्रश्नावर सलमान काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.