चांदिवली स्टुडिओमध्ये शुक्रवारी रात्री मराठीतील तब्बल १८ तारकांची मांदियाळी जमली होती. या सर्व तारका एकाच गाण्यावर थिरकत होत्या. ‘वंशवेल’ या दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात येणाऱ्या खास गाण्यासाठी मराठीतील या आघाडीच्या तारकांना एकत्र करण्यात आले होते.
महिलांवरील वाढते अत्याचार, त्यांचे संरक्षण आणि महिला सबलीकरण व समानता हा धागा पकडून या सर्व तारकांना ‘अंबे कृपा करी’ या गाण्यावर नृत्याविष्कार सादर करावयाचा होता. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, नेहा पेंडसे, स्मिता तांबे, दीपाली सय्यद, मेघा घाडगे, पूजा सावंत, पूर्वा पवार, सई लोकूर, सीया पाटील, स्मिता शेवाळे, तेजा देवकर, समिधा गुरू, शर्वरी पिल्ले, विद्या करंदीकर, नम्रता गायकवाड, मनीषा केळकर, सोनाली खरे या तारकांच्या उपस्थितीत या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या या गाण्याला अमितराज याने संगीत दिले असून आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे. विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तारकांनी नृत्याविष्कार सादर केला. महिलांवरील वाढते अत्याचार, त्यांचे संरक्षण आणि त्यांना समान दर्जा मिळावा या आशयाचे हे गाणे आहे. या गाण्यामध्ये सर्वच तारकांचा नृत्याविष्कार अप्रतिम झाला असून शुक्रवारी संध्याकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ असे सलग १२ तास या गाण्याचे चित्रीकरण अखंडपणे करण्यात आले, अशी माहिती राजीव पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा