नुकताच ‘१९०९’ या चित्रपटाचा प्रिमियर नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये झाला. पाहणा-याला घटनेच्या केंद्रस्थानी असल्याची अनुभूती देणा-या ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी’ या तंत्रज्ञानाचा वापर प्रथमच मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘१९०९’च्या निमित्ताने होणार आहे.
स्वातंत्र्यलढ्यावर आजवर अनेक चित्रपट आले. मात्र, स्वातंत्र्यलढ्याचे अनेक पैलू आजही दुर्लक्षित आहेत. मिसरूडही न फुटलेल्या असंख्य तरुणांनी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरोधात सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळत स्वातंत्र्यवेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली. असेच तीन तरुण म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे. वयाची विशीही न गाठलेल्या या तरुणांनी २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर तिघेही हसत हसत फासावर गेले. त्याकाळी अवघ्या देशभरात खळबळ माजवणाऱ्या या तीन क्रांतीवीरांची शौर्यगाथा पडद्यावर मांडण्यास ‘१९०९’ हा चित्रपट सज्ज झाला आहे.
निर्माते अजय कांबळी यांनी ‘१९०९’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन अभय कांबळी यांचे असून दिलीप अल्लम हे सहनिर्माते आहेत. अक्षय शिंपी, रोहन पेडणेकर, श्रीकांत भिडे, श्रीनिवास जोशी, शुभंकर एकबोटे, चेतन शर्मा, अमित वझे आदि अनेक उमदे कलाकार ‘१९०९’ मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०१४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय