देशभक्तीपर ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा आपल्याकडे मोठी आहे. चित्रपट माध्यम देशात अवतरले तेव्हापासून देशभक्ती, पौराणिक चित्रपट मोठय़ा प्रमाणावर करण्यात आले. स्वातंत्र्यापूर्वी चित्रपट
अनंत कान्हेरे व त्यांचे सहकारी विनायक देशपांडे, कृष्णाजी कर्वे यांनी २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिक येथील तत्कालीन इंग्रज कलेक्टर जॅक्सन याचा वध विजयानंद नाटय़गृहात केला. ही घटना शालेय पुस्तकांतूनही मोठय़ा प्रमाणावर मांडली गेलेली नाही. त्यामुळे अशा घटनेवर चित्रपट करून चित्रपटकर्त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या परंपरेत मोलाची भर घातली आहे हे निश्चित.
स्वातंत्र्ययुद्धात उडी घेऊन जिवाची बाजी लावण्याचे काम ज्या ज्या क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी केले अशा व्यक्तींबद्दल आजच्या प्रेक्षकाला आणि नागरिकांना चित्रपटांतून माहिती करून देणे हे काम स्तुत्य आहेच. परंतु, चित्रपट म्हणून कथानक रचून त्याचे चित्रण करताना अनेकदा चित्रपट फसला आहे. अनंत कान्हेरे यांचे शिक्षण सुरू असतानाच बाबाराव सावरकर यांना अन्यायाने अटक करण्यात आली. अभिनव भारत संघटनेचा सदस्य बनण्याची अनंत कान्हेरे यांची तीव्र इच्छा, सशस्त्र क्रांतीमध्ये सहभाग घेण्याची त्यांची ओढ आणि जॅक्सनचा वध हे सगळे प्रभावीपणे दिग्दर्शक दाखवितात. परंतु, चित्रपटाचा भर जॅक्सन वधाचा कट कसा रचला गेला, त्यासाठी अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांची बाबाराव सावरकर यांच्याशी कोणती चर्चा झाली यावर अधिक आहे. असे भर असणे हेही सयुक्तिक असले तरी पडद्यावर ही चर्चा, खलबतं पाहताना प्रेक्षक त्यात रमू शकत नाही. अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांचे शस्त्रास्त्रांचा सराव करण्याचा प्रसंग, निधी संकलन, बॉम्ब तयार करणे यातून क्रांतिकारकांची धडपड चांगल्या प्रकारे आजच्या प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. परंतु, अनेक ठिकाणी खोलीत बसून केलेल्या चर्चा यामुळे चित्रपट पडद्यावरचे नाटक वाटावे असा दिसतो.
दिग्दर्शकांना दाद द्यायला हवी ती कोणतेही प्रस्थापित कलावंत न घेता त्यांनी अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे, कृष्णाजी कर्वे, बाबाराव सावरकर अशा प्रमुख व्यक्तिरेखांसह सर्वच व्यक्तिरेखांमध्ये नव्या दमाचे कलावंत घेतले आहेत. अनंत शिंपी, श्रीकांत भिडे, रोहन पेडणेकर, अमित वझे, श्रीनिवास जोशी, चेतन शर्मा, शुभंकर एकबोटे, सुशील इनामदार यांच्यापासून सर्वच कलावंतांनी चोख अभिनय केला आहे.
जॅक्सनचा वध करण्यासाठी लागणारी मानसिक तयारी करण्यासाठी अनंत कान्हेरे कोणते प्रयत्न करतात, त्यांचा निर्धार कशा पद्धतीने पक्का होतो हे दाखविणारे आणखी प्रसंग असते तर अनंत कान्हेरे यांचे स्वातंत्र्ययुद्धातील योगदान किती महत्त्वाचे आणि मोठे होते हे प्रेक्षकाला अधिक चांगल्या प्रकारे पटवून देता आले असते. उत्कृष्ट निर्मितीमूल्ये, संगीत, अभिनय, रंगभूषा, वेशभूषा, काळ उभा करणे यात चित्रपटकर्ते निश्चितपणे यशस्वी झाले आहेत. परंतु, तरीसुद्धा या प्रामाणिक प्रयत्नापलीकडे जाऊन अधिक नाटय़, अधिक रंजकता, अधिक उत्कंठा दाखवून चित्रपट रंजक करणे गरजेचे होते असे प्रेक्षकाला वाटून जाते.
१९०९ स्वातंत्र्ययुद्धातील ज्वलंत अध्याय
श्री व्यंकटेश मुव्हीज् इंटरनॅशनल
निर्माते- अभय कांबळी, अजय कांबळी
लेखक-दिग्दर्शक-संकलक- अभय कांबळी
छायालेखक- राम अल्लम
सह-छायालेखक- इम्तियाज बारगीर
संगीत- प्रदीप वैद्य
कलावंत- अक्षय शिंपी, श्रीकांत भिडे, श्रीनिवास जोशी, अमित वझे, रोहन पेडणेकर, चेतन शर्मा, जयदीप मुझुमदार, हर्षद पांचाळ, नेहा मांडे, शुभंकर एकबोटे, चार्ल्स थॉमसन, स्वानंद देसाई व अन्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा