अर्जुन कपूर या आधी दोन्ही चित्रपटांमध्ये बंदुकधा-याच्या भूमिकेत दिसला आहे. पण आता ‘२ स्टेटस्’ या आगामी चित्रपटात तो एका प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे.
२स्टेटस् मधली मीझी भूमिका माझ्या वास्तविक आयुष्याशी मिळतीजुळती आहे. ‘इशकजादे’ आणि ‘औरंगजेब’ चित्रपटातील भूमिका माझ्या वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखेशी फारच विसंगत होत्या. पहिल्या दोन्ही चित्रपटांमध्ये मी गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसलो. त्यात माझ्या अवतीभोवती केवळ बंदुकाच होत्या. सदर चित्रपटात मात्र माझ्याभोवती फुल आणि केक दिसणार आहेत. महाविद्यालयीन आयुष्य संपल्यावर बॅंकेत काम करणारा आणि प्रेमाच्या शोधात भारतभर फिरणारा प्रेमी अशी भूमिका मी साकारत आहे, असे अर्जुन कपूर याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले. चित्रपटात मी एका तरुण प्रियकराची भूमिका करत असून जो टी-शर्टस, जिन्स आणि गॉगल्स परिधान करतो. आधीच्या दोन्ही चित्रपटांमध्ये मी अशा स्वरुपात दिसलो नव्हतो. त्यामुळे या नवीन रुपाकरिता मी उत्सुक आहे असे अर्जुन म्हणाला.
या चित्रपटाची कथा चेतन भगतच्या ‘२ स्टेटस् ‘ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात अर्जुन दिल्लीस्थित क्रिश मल्होत्राची तर आलिया भट ही एक दक्षिणात्य मुलगी अनन्या स्वामिनाथनची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन याने केले असून करण जोहर याचा निर्मिता आहे. ‘२ स्टेटस् ‘ हा चित्रपट पुढील वर्षी १८एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.