‘त्या’ रात्री अभिनेता सलमान, भाऊ तसेच मित्रांसोबत जुहू येथील ‘रेन’ बारमध्ये आला होता. बार व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून आपण त्यांना मद्य दिले. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत तो तेथे होता, असे सांगत या बारमधील बार टेंडरने सलमानची ओळख पटवली. मात्र त्याने मद्यपान केले की नाही हे आठवत नसल्याचेही त्याने उलटतपासणीदरम्यान सांगून सलमानला काहीसा दिलासा दिला.
१२ वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून, त्यापैकी एकाच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपाअंतर्गत नव्याने खटला चालविण्यात येत आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर सलमानवरील या खटल्याची सुनावणी होत असून सोमवारी पुन्हा एकदा सलमान न्यायालयासमोर हजर झाला होता. बहिण अलवीरा, अर्पिता आणि अंगरक्षकासह न्यायालयात दाखल झालेला सलमान खटल्याची सुनावणी सुरू झाल्यापासून बराच वेळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभाच होता.
घटनेच्या आधी सलमानने मद्यपान केले होते हे सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने ‘रेन’ बारमधील बार टेंडर मलोय बागची साक्ष नोंदविण्यात आली. बाग याने साक्ष देताना सांगितले की, सलमान ‘त्या’ रात्री अकराच्या सुमारास भाऊ आणि मित्रांसोबत बारमध्ये आला होता. सलमान हा नेहमीच तेथे येत असल्याने त्याला ओळखत असल्याचेही त्याने सांगितले. त्यांच्यासाठी एक विशेष टेबल आधीच आरक्षित ठेवण्यात आले होते. बार व्यवस्थापकाने त्यांच्या टेबलची जबाबदारी आपल्यावर सोपवली होती. त्यामुळे सलमान आणि त्याच्यासह असलेल्यांनी ‘व्हाईट बकार्डी रम’ आणि कॉकटेल्स मागवल्यानंतर आपण त्यांना ती नेऊन दिली होती. मध्यरात्री दीड-दोन वाजेपर्यंत सलमान दोन मित्रांसोबत बारमध्ये होता, असेही बाग याने सांगितले. तसेच त्या रात्री ज्याला मद्य नेऊन दिले तो सलमान न्यायालयात हजर आहे का, अशी विचारणा करण्यात आल्यानंतर बागने आरोपीच्या पिंजऱ्यातील सलमानच्या दिशेने पाहत त्याची ओळख पटवली. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्राद्वारे अपघाताबाबत कळल्याचे आणि पोलिसांनी आपलाही जबाब नोंदवल्याचे बाग याने न्यायालयाला सांगितले. उलटतपासणीदरम्यान मात्र त्याने बारमधील दिवे काहीसे मंद असल्याने सलमानने मद्यपान केले की नाही हे आपण सांगू शकत नसल्याचे म्हटले.
सलमानचा भाऊ सोहेल खान याचा अंगरक्षक लक्ष्मण मोरे याचीही या वेळी साक्ष नोंदविण्यात आली. सोहेलही ‘त्या’ रात्री सलमानसोबत बारमध्ये गेला होता. मात्र तो लवकर घरी परतला. त्यानंतर मध्यरात्री तीनच्या सुमारास तीन व्यक्ती घराच्या दिशेने धावत आल्या आणि त्यांनी सलमानच्या गाडीला अपघात झाल्याचे आपल्याला सांगितले. आपण लगेचच सोहेलला त्याबाबत कळवले आणि आम्ही दोघेही घटनास्थळी रवाना झालो. पण सलमान तेथे नव्हता, अशी साक्ष मोरे याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा