मुंबई सत्र न्यायालयाने सलमान खानच्या विनंती अर्जावरील निर्णय २४ जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. मद्यपान करून भरधाव गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या काही जणांना चिरडल्याचा सलमानवर आरोप आहे. मुख्यदंडाधिकारयांनी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवत या खटल्याचा फेरतपास करण्याचा आदेश दिला होता.
मुख्यदंडाधिकारयांच्या निर्णयाविरोधात सलमानने सत्र न्यायालमध्ये विनंती अर्ज दाखल केला होता. या विनंती अर्जामध्ये आपल्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालवण्यात येऊ नये, अशी विनंती सत्र न्यायालयाला केली होती. सलमानच्या अर्जावरील निर्णय पुढे ढकलत सत्र न्यायालयाने या खटल्यावर २४ जूनपर्यंत सुनावणी होणार नसल्याचे सांगितले. सत्रन्यायालयाचे न्यायाधीश यु. बी. हेजिब यांनी एक महिन्यापूर्वी सलमानच्या विनंती अर्जावर सुनावणीसाठी १० जून ही तारीख ठरवली होती.
“सलमानवर अतिशय गंभीर आरोप लावण्यात आला असून, मुख्यदंडाधिकारयांचा आदेश उपलब्ध पुराव्यांच्या पूर्ण विरोधी व कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आहे.”, असा युक्तिवाद सलमानचे वकील अशोक मुंदरगी यांनी केला. सलमानकडून हा गुन्हा जाणिवपूर्वक घडला नसून, त्याच्या वाहन चालवण्याने एकाचा मृत्यू होईल व इतर चार जखमी होतील हे त्याला माहिती नव्हते. हे समजून घेण्यात मुख्यदंडाधिकारी कमी पडले असल्याचे मुंदरगी म्हणाले.
सरकारी वकील शंकर एरंडे यांनी सलमानच्या अर्जाला विरोध केला आहे. सलमानवरील सदोष मनुष्यवधाचा आरोप व मुख्यदंडाधिकारयांचा आदेश योग्य असल्याचे एरंडे म्हणाले.