प्रसिद्धीचे वारे कुठे, कसे शिरतील आणि काय परिणाम करून जातील याची त्या वाऱ्यांच्या वेगालाही जाणीव होऊ नये इतक्या झटपट त्या गोष्टी घडून जातात आणि समाजासाठी त्या ‘मैलाचा दगड’ होऊन राहतात. हिंदी चित्रपटसृष्टी आणि आजच्या घडीला तिच्यापेक्षाही मोठं होऊ पाहणाऱ्या छोटय़ा टीव्हीच्या सृष्टीत असाच काहीसा बदल या प्रसिद्धीच्या वाऱ्यांनी घडवून आणला आहे. त्याची एक झलक यंदाच्या २० व्या स्क्रीन वार्षिक पुरस्कारात पाहायला मिळाली. आजवर केवळ रंगारंगी सोहळा कॅमेऱ्यात बंदिस्त करून तो आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहमहमिका करणाऱ्या वाहिन्यांनी प्रसिद्धीच्या या तंत्राचा असा काही उपयोग करून घेतला आहे की नेहमी सातव्या आस्मानात राहणाऱ्या फिल्मी सिताऱ्यांनाही पहिल्यांदाच आपल्याला सहजपणे घराघरांत पोहोचवणाऱ्या या वाहिन्यांचे स्वतंत्र अस्तित्व मुकाट मान्य करावे लागले आहे. त्याहीपेक्षा त्यांचा हात हातात घेऊन ‘मिले सूर मेरा तुम्हारा.. तो सूर बने हमारा’ असा नवा स्वर आळवावा लागतो आहे. ‘लाइफ ओके’ वाहिनीबरोबर ‘स्क्रीन’ पुरस्कार सोहळयासाठी गट्टी जमवताना थोडं तुमचं थोडं आमचं करत ही मोठय़ा पडद्यावरची आणि छोटय़ा पडद्यावरची मंडळी एकत्र आली आणि हा रंगारंग सोहळा साजरा केला. बाकी महानायक अमिताभ बच्चन यांना मिळालेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार, सूत्रसंचालक शाहरूख खानने नेहमीप्रमाणे स्वत:सह अन्य कलाकारांची घेतलेली फिरकी आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘यारियाँ’ चित्रपटापासून ते आगामी विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘क्रिएचर’ चित्रपटांसाठी केली गेलेली प्रसिद्धी, ‘यो यो हनी सिंग’ नावाच्या शाहरूख खानच्या ‘लुंगी डान्स’ फे म आवडत्या गायकाच्या प्रसिद्धीची केलेली मोठी सोय अशा अनेक चमत्कारिक पण, बदलत्या ट्रेंडसची चाहूल देणाऱ्या घटनांनी हा सोहळा अविस्मरणीय ठरला आहे असे म्हणायला हरकत नाही…
सबकुछ दीपिका
पुरस्कार तिचे, कार्यक्रम तिचा, नृत्याविष्कार तिचे आणि चर्चाही तिचीच असा ‘सबकुछ दीपिका’ माहोल स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात होता. दीपिकाला बोलावून शाहरुखने तिच्याबरोबर ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधल्या गाण्यांच्या भेंडय़ांचा खेळ खेळून घेतला. दीपिकाचे 1दोन बहारदार कार्यक्रम हे फक्त टीव्हीवर पाहायला मिळणार असल्याने प्रत्यक्ष सोहळ्यात फक्त त्यांचा उल्लेख करण्यात आला. सोहळ्याचा शेवट मात्र तिच्या ‘नगाडा संग ढोल बाजे’ या गाण्यावरच्या नृत्याने झाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा परीक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तर दीपिका तितलीसारखी उडतच स्टेजवर पुरस्कार घेण्यासाठी पोहोचली आणि लोकप्रिय अभिनेत्रीचा पुरस्कारही तिलाच जाहीर झाल्यावर तिच्या आनंदाला उधाण आले होते.
मुलींचा आग्रह आणि तनुजाचे दोन मराठी शब्द
मराठी चित्रपटांमध्ये सवरेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना पुरस्कार जाहीर झाला. आणि मराठी चित्रपटांचे पुरस्कार देण्यासाठी आधीच व्यासपीठावर पोहोचलेल्या काजोल आणि तनिषाने एकच चीत्कार केला. तनुजा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या आणि त्यांच्या या दोन्ही मुलींनी त्यांना मराठीत बोल.. मराठीत बोल असा आग्रह केला. त्यामुळे नमस्कार! अशी खणखणीत सुरुवात करून तनुजांनी या यशासाठी आपल्या चाहत्यांचे आभार मानले. काजोल सध्या हिंदी चित्रपटांपासूनही लांब असली तरी ‘पितृऋण’ या मराठी चित्रपटात आईची मुख्य भूमिका असल्याने तिने स्वत: चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तोडक्यामोडक्या मराठीत का होईना तनुजाची पाठराखण केली होती. आणि आता तिची बहीण तनिषाही आगामी मराठी चित्रपटात नायिका म्हणून दिसणार आहे.. त्यामुळे ‘जय हो’..मुखर्जी कन्यकांच्या मराठी वाटचालीला..
सोनू सूदचे स्टंट्स..
आणि पहिला अ‍ॅक्शन पुरस्कार
शाहरूख कृपनेच असेल बहुधा पण, त्याचा ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटातील सहकलाकार सोनू सूद पहिल्यांदाच खऱ्याखुऱ्या हीरोसारखा अ‍ॅक्शन करताना दिसला. सोनू सूदच्या अ‍ॅब्जच्या प्रेमात पडल्यामुळेच तर त्याला शाहरूखबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि ते प्रेम शाहरूखने जाहीर व्यक्त केले. मोटरसायकलवरून सराईतपणे अ‍ॅक्शन स्टंट केलेल्या सोनूचे जाहीर कौतुक शाहरूखने के लेच, पण सोनू आणि अ‍ॅक्शनचा दुसरा लिटिल मास्टर शाहीद कपूरच्या हस्ते अ‍ॅक्शनसाठीचा पहिला स्क्रीन पुरस्कार ‘मद्रास कॅफे’ चित्रपटासाठी मनोहर वर्मा यांना देण्यात आला.
रणवीरचे ‘डिप्पी’ प्रेम
दीपिका पदुक ोण हे यावर्षीच्या ‘स्क्रीन’ पुरस्कारांचे मुख्य आकर्षण होते. गोविंदाच्या गाण्यांवर ताल धरणाऱ्या रणवीरला- दीपिकाला पाहून सारखं उचंबळून येत होतं. त्यात शाहरुखनेही त्याला ‘लीलाबद्दल विचारून विचारून त्याच्या प्रेमभावनांना मोकळी वाट करून दिली. सोहळ्याच्या उत्तरार्धात जेव्हा दीपिकाला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा योगायोगाने सूत्रसंचालकाची भूमिका रणवीर सिंगकडे होती. रणवीर दीपिकाचे तोंडभरून कौतुक करत सुटला होता. दीपिकाने मात्र त्याच्या बडबडीकडे अजिबात लक्ष दिले नाही, की आपल्या ‘अफेअर’ची हलकीशी चाहूलही लागू दिली नाही.
स्टेज पे होगा हंगामा..
जब आएगा ‘यो यो’ मामा
‘यो यो हनी सिंग’ असा स्वत:च्याच नावाचा स्वत:च्याच गाण्यात जाहीर जयजयकार करत हिंदी चित्रपटसृष्टीत घुसलेल्या थैमानाला कोणी कितीही नावे ठेवली तरी आवर घालणे मात्र अशक्य होऊन बसले आहे. दिव्या खोसला कुमार या नवोदित दिग्दर्शिकेच्या ‘यारियँा’ं चित्रपटाला जी काही लोकप्रियता मिळाली आहे त्यात हनी सिंगच्या ‘एबीसीडी’ आणि ‘सॅनी सॅनी’ या गाण्यांचा हात आहे. त्यामुळे या गाण्यांच्या निमित्ताने टीमबरोबर नाचलेल्या हनी सिंगला पुन्हा एकदा शाहरूखने बोलावून घेतले तेव्हा भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या. सदा रॅपमध्ये गाणाऱ्या हनीची फिरकी घेत शाहरूखने त्याची जोरदार प्रसिद्धी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“स्क्रीन पुरस्कार गेली २० वर्षे होतोय. नेहमी हे पुरस्कार सोहळे पाहायचो. कधीतरी स्क्रीनची बाहुली आपल्याकडे यावी, अशी इच्छा होती. यंदाच्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात बालकपालक चित्रपटासाठी तीन तीन पुरस्कार मिळवून हे स्वप्न पूर्ण झालंय. सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शक, सवरेत्कृष्ट नवोदित कलाकार प्रथमेश परब असे तीन पुरस्कार ‘बालक-पालक’ चित्रपटाला मिळाले. हिंदीतल्या एवढय़ा मोठय़ा आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांची जी दखल घेतली जाते हे उल्लेखनीय आहे. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचा आनंदही तितकाच खास आहे.”
रवी जाधव, दिग्दर्शक

“पुरस्कार सोहळ्यात हे वर्ष ‘दुनियादारी’चेच असेल असे मनात वाटत होते. दुनियादारी चित्रपटाला जे यश मिळालं त्यामुळे चित्रपटाला असलेली लोकमान्यता आधीच सिद्ध झाली होती. स्क्रीन पुरस्कारांमुळे या चित्रपटाला राजमान्यताही मिळाली आहे. स्क्रीन पुरस्कारांचे व्यासपीठ हे नेहमीच चोखंदळ सिनेमांसाठी ओळखले जाते. अशा ठिकाणी आपल्या चित्रपटाची निवड होणे हे लोकांनी उचलून धरलेल्या चित्रपटाला मिळालेली पावती आहे. स्क्रीन पुरस्कार हे परीक्षकांचे पुरस्कार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे समीक्षकांनी दिलेला पुरस्कार मिळविण्यासारखा आहे.”
निखिल साने, निर्माता

‘दुनियादारी’ चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हा माझा पहिला स्क्रीन पुरस्कार आहे. स्क्रीन पुरस्कार मिळविणे हे माझे स्वप्न होते. दुनियादारी चित्रपटामुळे ते पूर्ण झाले आहे. पुरस्कारांसाठी म्हणून मी कधी चित्रपट बनविले नाहीत. अतिशय कठोर मेहनतीने चित्रपट बनविण्याकडे माझा कल असतो. पण जेव्हा तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाते, त्याला पसंतीची पावती मिळते. तेव्हा आपली मेहनत सार्थकी लागल्याची सुखद भावना मनाला स्पर्शून जाते. स्क्रीन पुरस्काराने मला तो आनंद दिला आहे.
संजय जाधव, दिग्दर्शक

अमिताभ राष्ट्रपती व्हावेत – शत्रुघ्न सिन्हा
आपला जुना सहकारी.. यारदोस्त अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यासाठी व्यासपीठावर आलेल्या शॉटगन शत्रुघ्न सिन्हांची तोफ थांबता थांबत नव्हती. अमिताभ यांना स्क्रीनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर आता आम्हाला कोणालाही हा पुरस्कार मिळाला, नाही मिळाला तरी काही वाटणार नाही. आता मला अमिताभ यांना देशाचा राष्ट्रपती झालेले पाहण्याची इच्छा आहे, अशी अतिशय भावनिक इच्छा त्यांनी जाहीर केली. पण, आपल्या मित्राचे भाषण ऐकल्यानंतर आपल्या नेहमीच्या सहजस्वभावाने पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या अमिताभ बच्चन यांनी मात्र माझ्या मित्राचे म्हणणे मनावर घेऊ नका.. असे सांगत त्यांची दांडी गुल केली. पुरस्कारानंतर हा महानायक काही वेगळे बोलेल अशी अपेक्षा असताना त्यांनी मात्र जुजबी बोलून आभार व्यक्त केले. तरीही हा सोहळा या ‘अमिताभ’ क्षणांनीच जिंकला हेही तितकेच खरे..