मुंबई आणि उपनगरीय परिसरातील चित्रपट प्रेमींना समकालीन आशियाई चित्रपट पाहण्याची संधी देणारा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव यंदा डिसेंबर महिन्यात होणार आहे. यावर्षी या महोत्सवात समकालीन भारतीय प्रादेशिक चित्रपट आणि समकालीन मराठी चित्रपट अशा दोन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धासाठी प्रादेशिक आणि मराठी चित्रपट निर्मात्यांनी लवकरात लवकर प्रवेशिका भरण्याचे आवाहन महोत्सवाच्या आयोजकांनी केले आहे.
२० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात होणाऱ्या समकालीन भारतीय प्रादेशिक चित्रपट आणि समकालीन मराठी चित्रपट अशा दोन स्पर्धासाठी ऑगस्ट २०२२ नंतर निर्माण झालेल्या प्रादेशिक आणि मराठी चित्रपटांना सहभाग घेता येणार आहे. स्पर्धकांना महोत्सवाच्या ६६६. http://www.Thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळावर जाऊन http://www.Filmfreeway मार्फत प्रवेशिका भरता येतील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने आणि प्रभात चित्र मंडळाच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवात यंदा जपान, इराण, बांगलादेश, श्रीलंका अशा विविध आशियाई देशांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले चित्रपट पाहता येणार आहेत. याशिवाय, एशियन स्पेक्ट्रम, चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या चित्रपटाचे सिंहावलोकन हे विभागही या महोत्सवात असणार आहेत. महोत्सवात मान्यवर परीक्षकांच्या समितीने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांना पुरस्कार देण्यात येणार असून एशियन कल्चर अवार्ड, सत्यजित राय स्मृती पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट समीक्षकाला स्वर्गीय सुधीर नांदगावकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.