मुंबई : ‘एखादी इमारत ही अभियंत्यापेक्षा वास्तुविशारदाच्या नावाने ओळखली जाते, परंतु मी नम्रपणे खरे सांगतो की चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळत नाही. याबाबत माझी वैयक्तिक तक्रार नाही, मला आजवर चित्रपटसृष्टीने भरभरून प्रेम दिले आहे. मात्र आजही काही उल्लेखनीय लेखकांना अपेक्षित श्रेय मिळत नाही. चित्रपट या कलाकृतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या अशा लेखकांना प्रकाशझोतात आणून नावलौकिक, योग्य तो मान व दाम मिळणे आवश्यक आहे’, असे मत ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. तसेच भारतात उत्तम कलागुण व कलारत्नांची खाण असून त्याला योग्य तो वाव मिळाला पाहिजे. तसेच आपण आपल्या मातीतील प्रादेशिक कलाकृतींसाठी आग्रही राहायला हवे’, असेही जावेद अख्तर म्हणाले.
एशियन फिल्म फाऊंडेशन आयोजित २१ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते अंधेरी येथील मूव्हीमॅक्स चित्रपटागृहात शुक्रवारी झाले. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ‘एशियन फिल्म कल्चर अॅवॉर्ड’ या विशेष पुरस्काराने जावेद अख्तर यांना गौरविण्यात आले. या वेळी एशियन फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम, महोत्सवाचे संचालक डॉ. संतोष पाठारे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होते.
हेही वाचा >>> “त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. शोले , जंजीर, दिवार यांसारख्या अतिशय लोकप्रिय चित्रपटांचे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी रसिकांना आजवर अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. गीतकार, पटकथाकार आणि कवी म्हणून भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे.
अंधेरी व शीव येथील मूव्हीमॅक्स चित्रपटगृह तसेच ठाण्यातील विवियाना मॉल येथील सिनेपोलिस चित्रपटगृहात १६ जानेवारीपर्यंत चित्रपट पाहायला मिळणार आहेत. ‘ब्लॅक डॉग’ या चिनी चित्रपटाने २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ झाला.
दरम्यान, ‘आपल्या चित्रपटांची परंपरा ही गीत-संगीताची आहे. मात्र हल्लीच्या चित्रपटांमध्ये मला गीत- संगीताचा अभाव दिसतो. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ही परंपरा आवर्जून जपली जाते.
आपल्याकडे चित्रपटांत गीत – संगीताला महत्त्व दिले. तर आपला चित्रपट हा जागतिकदृष्ट्या नक्कीच नावाजला जाईल. तसेच आशियाई देशांमध्ये प्रचंड कल्पकता व ऊर्जा आहे. त्यामुळे भारतात आशियाई चित्रपटांचा महोत्सव होणे हे महत्त्वपूर्ण आहे. हा चित्रपट महोत्सव आशियाई देशातील कलाकारांना प्रोत्साहन देणारा आहे’, असेही जावेद अख्तर म्हणाले.
‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आशियाई चित्रपटांवर कमी लक्ष केंद्रित होते. त्यामुळे आशियाई देशातील चित्रपटांचा स्वतंत्र महोत्सव सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर चित्रपट समीक्षक व अभ्यासक दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाने ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली’, असे मत किरण व्ही. शांताराम यांनी व्यक्त केले.
बदलत्या तंत्रज्ञानानुसार सुविधा देण्यावर भर : म्हसेपाटील
दादासाहेब फाळके चित्रनगरीची १९७७ साली स्थापना झाली असून २०२७ साली ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे ‘व्हिजन अॅट ५०’ हे नजरेसमोर ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार अद्यायावत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि चित्रपटसृष्टीशी निगडित सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच आम्ही ‘कलासेतू’ नावाच्या संकेतस्थळाची निर्मिती केली असून लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांना एकाच ठिकाणी संवाद साधता येईल. त्यामुळे या माध्यमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि विचारांची देवाणघेवाण करावी
रफिक बगदादी, अनिल झणकर यांनाही पुरस्कार
● यंदाचा सत्यजित राय स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सिनेपत्रकार, मुंबईच्या इतिहासाचे तज्ज्ञ, मुंबईचा सिनेमाशी असलेला संबंध, बॉलीवूडमधील अनेक कलावंत, दिग्दर्शकांच्या बाबत विविध इंग्रजी वृत्तपत्रे, नियतकालिकांतून लेखन, मुंबई हेरिटेज विषयातील जाणकर असलेले रफिक बगदादी यांना प्रदान करण्यात येणार आहे. अनेक जुन्या चित्रपटांचे संग्राहक म्हणूनही बगदादी यांना ओळखले जाते.
● चित्रपटाची कथा आणि पुस्तकासाठी दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पारितोषिक मिळवणारे लेखक, चित्रपट इतिहासाचे तज्ज्ञ, स्क्रीन स्टडीज् अॅण्ड रिसर्च विषयाचे एफटीआआयमधील प्राध्यापक अनिल झणकर यांना सुधीर नांदगावकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.