दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला सध्या खूप चर्चेत आली आहे. वयाच्या २३व्या वर्षी श्रीलीला तिसऱ्यांदा आई झाल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीचा एका गोंडस चिमुकलीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रीलीलाने या गोंडस चिमुकलीला दत्तक घेतल्याचं म्हटलं जात आहे. पण, व्हायरल होणाऱ्या फोटोमागचं नेमकं सत्य काय आहे? जाणून घ्या…
अभिनेत्री श्रीलीलाने २०२२ मध्ये दोन दिव्यांग मुलांना अनाथाश्रमातून दत्तक घेतलं होतं. गुरू आणि शोभिता असं या दोन मुलांची नावं आहेत. या दोघांना चांगलं जीवन देण्याचा श्रीलीला निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, श्रीलीलाने ‘बाय टू लव्ह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हे पाऊल उचललं होतं.
२७ मार्चला श्रीलीलाने एका गोंडस मुलीबरोबर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री मुलीचं प्रेमाने चुंबन घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “घरी नवीन पाहुणी आली आहे.” या फोटोमुळेच श्रीलीलाने आणखी एका मुलीला दत्तक घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेत्री तिसऱ्यांदा आई झाल्याचं म्हटलं जात आहे. पण, माहितीनुसार, श्रीलीलाची ही मुलगी नसून तिच्या नातेवाईकांची मुलगी आहे.
दरम्यान, श्रीलीलाने तेलुगु आणि कन्नड सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिने एमबीबीएस शिक्षण घेतलं आहे. २०२१मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्याआधी तिने ‘किस’ चित्रपटातून पदार्पण केलं. ती भरतनाट्यम नृत्यांगना आहे. श्रीलीला ही बंगळुरूच्या स्त्रीरोगतज्ज्ञ स्वर्णलताची मुलगी आहे. तिचा जन्म आई-वडील विभक्त झाल्यानंतर झाला होता. जेव्हा श्रीलीलाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं, तेव्हा तिला सुरपनेनी सुभाकर यांची मुलगी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं.
त्यानंतर २०२१मध्ये सुरपनेनी सुभाकर राव यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, श्रीलीला माझी मुलगी नाहीये. पूर्वाश्रमीची पत्नी स्वर्णलतापासून विभक्त झाल्यानंतर श्रीलीलाचा जन्म झाला. त्यामुळे माझ्याशी नाव जोडणं बंद करा, अशी विनंती केली. एका अहवालानुसार, श्रीलीलाची एकूण संपत्ती सुमारे १५ कोटी रुपये आहे. करिअरच्या सुरुवातीला, ती चित्रपटांसाठी प्रति तास ४ लाख मानधन घेत होती. नंतर तिचं मानधन वाढून १.५ कोटी रुपये झालं. पुढे ३ कोटी रुपयांपर्यंत गेलं. आता श्रीलीला ४ कोटी मानधन घेत आहे.
श्रीलीलाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटानंतर श्रीलीला बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘आशिकी ३’ चित्रपटात श्रीलीला कार्तिक आर्यनबरोबर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या श्रीलीलाचं नाव कार्तिक आर्यनबरोबर जोडलं जात आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.