अभिनेता शर्मन जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘काशी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शर्मन वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘रंग दे बसंती’, ‘स्टाइल’, ‘मेट्रो’, ‘गोलमाल’, ‘थ्री इडियट्स’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर आता मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. ‘काशी’ चित्रपटानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शर्मनने ही इच्छा व्यक्त केली.
‘मला मराठी भाषेविषयी खूप प्रेम आहे. महाराष्ट्राने मला भरभरून प्रेम दिलं. मला आता मराठी चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा आहे,’ असं तो म्हणाला. ‘काशी’ या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक धीरज कुमार म्हणाले की, ‘हा चित्रपट माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. शर्मन जोशी यातील भूमिकेसाठी परफेक्ट अभिनेता आहे. चित्रपटातील इतर भूमिकासुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतील असा मला विश्वास आहे.’
( आणखी वाचा : या सैतानाने जवळच्या व्यक्तींनाही सोडलं नाही- अलिशा चिनॉय )
‘काशी’ या चित्रपटात शर्मन जोशीसोबतच ऐश्वर्या देवन, मनोज जोशी, मनोज पहवा, अखिलेंद्र मिश्रा, क्रांती प्रकाश झा, पुष्कर तिवारी यांच्या भूमिका आहेत. आपल्या बहिणीच्या शोधात काशीला आलेल्या शर्मनला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. शर्मनच्या हटके भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.