मराठी सिनेमाचा आत्मा त्यातील आशय समजला जात असला तरी हल्ली दिग्दर्शक कोण हे बघूनही सिनेमाला गर्दी होण्याचा ‘ट्रेंड’ आला आहे. त्यामुळे जसे कलाकारांच्या नावाने चित्रपट चालतात तसेच दिग्दर्शकाच्या नावानेही सिनेमे चालू लागले आहेत. परंतु सशक्त आशय, प्रसिध्द कलाकार आणि सर्जनशील दिग्दर्शक असे भक्कम ‘पॅकेज’ घेऊन ‘बायोस्कोप’ हा सिनेमा येत आहे. चार दिग्दर्शक, चार कवितांवरील वेगवेगळ्या चार गोष्टी, चार कवी, चार संगीतकार अशा चौकोनी भिंगाच्या चौकटीतून सादर होणारा ‘बायोस्कोप’ १७ जुलै रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे.
टाईमपास, बालक-पालक, बालगंधर्व, नटरंग यासारख्या एकापेक्षा एक हीट देणारा दिग्दर्शक रवी जाधव , पिपाणी, टुरिंग टॉकीज, पोस्टकार्ड, अनवट, अनुमती यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे , गुरूपौर्णिमा, भारतीय, तुला शिकवीन चांगला धडा, बे दुणे चार अशा चित्रपटांद्वारे घराघरात पोहचलेले तसेच सध्या सुरू असलेल्या ‘येक नंबर’चे दिग्दर्शक गिरीश मोहिते तर खेळ मांडला, गोजिरी, ती रात्र, शर्यत अशा चित्रपटांचे दिग्दर्शक विजू माने या चारही दिग्दर्शकांनी एकत्र येऊन एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. परंतु असे जरी असले तरी प्रत्येकाच्या दिग्दर्शनाचे वेगळेपण आणि खासियत रसिकांना अतिशय ठळक आणि स्पष्टपणे जाणवणार आहे. कारण चार वेगवेगळ्या कविंच्या कविता निवडून त्यांच्या चार कथांचा ‘बायोस्कोप’ येथे साकारण्यात आला आहे. यात मिर्झा गालिब यांच्या गझलवर गजेंद्र अहिरेने  ‘दिल-ए-नादान’ हा लघुपट तर संदीप खरेच्या कवितेवर रवी जाधवने ‘मित्रा’ हा लघुपट साकारला आहे.या लघुपटाला राष्ट्रीय पुरसकार मिळाला असून त्याचे सुमारे १५ नामांकित आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये सादरीकरण झाले आहे.  तसेच सौमित्र यांच्या कवितेवर ‘एक होता काऊ’ हा लघुपट विजू मानेने दिग्दर्शित केला आहे. हा लघुपट व मित्रा या दोन्ही लघुपटांचे प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनारोमा २०१४’ मध्ये निवड झाली होती. तर विदर्भातील प्रसिध्द कवी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर गिरीश मोहितेने ‘बैल’ नावाचा लघुपट बनविला आहे. कविता आणि त्यातून व्यक्त होणारी भावनिक कैफियत हा समान धागा धरून हे चौघे दिग्दर्शक या सिनेमाच्यानिमित्ताने एकत्र आले आहेत.
असे  म्हणतात दोन मराठी माणसं  एकत्र कधीच काम करू शकत नाहीत. मात्र हे ज्याने कोणी म्हणून ठेवले आहे, त्याच्या  मताला छेद देणारी कामगिरी या चार सर्जनशील दिग्दर्शकांनी करून दाखविली आहे. याविषयी रवी जाधव म्हणतो, ‘‘ठाणे आर्ट गील्डच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सगळेच कलाकार एकत्र जमलेलो होतो. त्यावेळी आपण एकत्रितरित्या काहीतरी करायला हवे असे सुचले. आम्ही दिग्दर्शक आहोत, त्यामुळे एकत्रित सिनेमा काढण्याचे ठरले.त्यावेळी चार वेगवेगळ्या कथा एकाच सिनेमात मांडणे ही कल्पनाच अत्यंत अनोखी होती. हा अभूतपूर्व प्रयोग साकारताना एक समान धागा असावा म्हणून कवितेवर सिनेमा काढण्याचे ठरविले. भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजवर कवितेवर एकही सिनेमा झालेला नाही. ही संकल्पना अद्वितीय असून, यामुळे अजून तीन सर्जनशील दिग्दर्शकांसोबत काम करण्याची, त्याच्याकडून बरेचकाही शिकण्याची दुर्मिळ संधीही या सिनेमामुळे मिळाली.’’
दिग्दर्शक विजू माने म्हणाला की, ‘‘प्रत्येक कवितेत एक गोष्ट असते.ती साकारणे जसे आव्हानात्मक होते तसेच मनोरंजन करणारेही होते.आम्हा चौघांची आवड कविता असल्याने  या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही कविता निवडताना चर्चा केल्या. संहिता एकमेकांना वाचून दाखविल्या. एरवी असे कधीच होत नाही. हा खुलेपणा या सिनेमाच्या निमित्ताने अनुभवता आला. प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या क्षेत्रात यशस्वी असल्याने प्रत्येकाच्या कामाची पध्दत जवळून पाहण्याची ही जणू सुवर्णसंधी होती. एकंदरीतच हा प्रकल्प करताना खूप मजा आली आणि खूप शिकताही आले.’’
‘‘मैत्रीत, नात्यात किंवा अगदी कामातही अहंकार मध्ये आला की, मतभेद होणारच, याचीच भिती वाटत होती. परंतु जेथे अहंकार बाजुला सरतो तेथेच कलेचा जन्म होते,’’ असे सांगत दिग्दर्शक गिरीश मोहिते म्हणाला की, ’’सुरूवातीला मला याची भिती वाटत होती. परंतु आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेले हे सगळेच दिग्दर्शक अत्यंत खेळीमेळीने एकत्र काम करत होते. आम्हा चौघांमध्ये कधीच इगो प्रोब्लेम झाला नाही. त्यामुळे सगळेच सुरळीत झाले. प्रत्येकाने  एकमेकांना आपापली मते दिली परंतु कोणीही एकमेकाच्या कामात हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे आपण जे करत आहोत त्याची चांगली वाईट दोन्ही बाजू समजल्या आणि काम अधिक चांगले झाले. ’’
दिग्दर्शक अहिरे म्हणाले की, ’’पहिल्यांदाच मराठीतील चार दिग्दर्शक एकत्र येऊन काम करत असल्याने हा प्रयोग आमच्यासाठीही तेवढाच उत्सुकता वाढविणारा होता. हा संपूर्ण अनुभव ङ्गार सुखद होता. ’’
अभय शेवडे यांच्या ‘गोल्डन ट्री एंटरटेंन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने ‘बायोस्कोप’ची निर्मिती केली आहे. तर ‘पीएसजे एंटेरटेंन्मेंट’चे शेखर ज्योती यांनी चित्रपट प्रस्तुत केला आहे. ’अथांश कम्युनिकेशन’,’विजू  माने प्रॉडक्शन्स’, ’प्री. टु .पोस्ट फिल्म्स’ व ’गोदा टॉकीज’ हे सहनिर्माते आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा