नाटक, बालनाट्य, गुढकथा, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे रत्नाकर मतकरी पुन्हा एकदा रंगमंचावर त्यांचं गाजलेलं ‘आरण्यक’ हे नाटक घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे हे नाटक ४४ वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
४४ वर्षापूर्वी रंगमंचावर आलेलं ‘आरण्यक’ हे रत्नाकर मतकरी यांचे पद्यबंधातले पौराणिक नाटक असून याची कथा महाभारतातील आहे. भारतीय युध्दानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर वनात जातात, ती ही कहाणी. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना या नाटकाचा अनुभव घेता येणार असून या नाटकात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहता येणार आहे.
अद्वैत थिएटर्स निर्मित ‘आरण्यक’ या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन रत्नाकर मतकरी यांनी केलं असून झी मराठी याचे सादरकर्ते आहे. झी मराठीने यापूर्वी ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘हॅम्लेट’ या नाटकांचंही सादरीकरण केलं आहे.
येत्या १८ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार असून १९७४ साली राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक सादर झालं होतं. विशेष म्हणजे, तेव्हा या नाटकामध्ये असलेले कलाकार आताच्या नवीन संचातही असणार आहेत.
दरम्यान, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या नाटकात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रतिभा मतकरी, रवि पटवर्धन हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. तर नकुल घाणेकर, अतुल महाजन, विक्रम गायकवाड, मीनल परांजपे हेदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखविणार आहेत. विशेष म्हणजे शशांक वैद्य यांच नेपथ्य असून या नाटकाला कौशल इनामदार यांनी संगीत दिलं आहे.