भारतातील नामांकित चित्रपट महोत्सव म्हणून ओळख असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज गोव्यात सुरुवात झाली. अतिशय उत्साही वातावरणात पणजी येथे या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि गोव्याच्या गव्हर्नर मृदुला सिन्हा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उग्घाटन करण्यात आले. या चित्रपट महोत्सवाचे हे ४९ वे वर्ष असून यामध्ये विविध विभागातील जागतिक दर्जाचे चित्रपट पाहण्याची संधी सिनेअभ्यासक आणि रसिकांना मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील युवकांमध्ये खूप गुणवत्ता दडलेली असून इफ्फीसारखे महोत्सव युवकांमधल्या गुणवत्तेला आणि कौशल्याला वाव देण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यक्त केले. या महोत्सवामुळे चित्रपटांचे उत्तम पद्धतीने आदानप्रदान होते. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी इफ्फीसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे गोवा सरकारच्या वतीने स्वागत केले. यावेळी गोव्याचे सार्वजनिक मंत्री सुधीर ढवळीकर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे व इतरही काही मान्यवर उपस्थित होते. ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा इस्रायल हा भागीदार देश असून यावर्षी झारखंड हे विशेष राज्य म्हणून निश्चित केले आहे असे खरे यांनी सांगितले.

‘द अस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमियरने महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. चित्रपट निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांनी राज्यवर्धन राठोड आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यांनी इफ्फी, चित्रपट क्षेत्र, क्रीडा क्षेत्र आणि चित्रपटातून दिले जाणारे सामाजिक संदेश यांवर आपली मते नोंदवली. बोनी कपूर, सुभाष घई, रणधीर कपूर, सिध्दर्थ राय कपूर, पूनम ढिल्लां, रमेश सिप्पी, मधुर भांडारकर, ऋषिता भट, फ्रेंच दिग्दर्शक ज्युलियन लिन्सेड आणि सिंगापूरचे चीन यान असे नामवंत यावेळी उपस्थित होते. अभिनेत्री मंदीरा बेदी आणि अमित साध यांनी आपल्या रंजक शैलीत उद्‌घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी मान्यवरांचे आभार मानले. या महोत्सवात ६८ देशातील २१२ चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 49th iffi opening ceremony in goa panjim
Show comments