‘मै उडना चाहता हूँ, दौडना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ… बस रुकना नही चाहता’ असं म्हणणारा बनी आठवतोय का, असा प्रश्न विचारला की सर्वांच्याच डोळ्यासमोर ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट उभा राहतो. रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलीन, आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याचाच डंका वाजला. या चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. मग ती ‘नैना तलवार’ म्हणू नका, ‘बनी’ म्हणजेच ‘कबीर’ म्हणू नका किंवा सतत स्वॅगमध्ये असणारी ‘अदिती’ म्हणू नका. बरं या साऱ्यांमध्ये ‘अवि’ला विसरुन चालणार नाही बरं.
आयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचं कथानक आणि कलाकारांचा अभिनय या साऱ्याची एक अशी घडी बसली जी खऱ्या अर्थाने अनेकांनाच फ्रेंडशिप गोल्स, रिलेशनशिप गोल्स आणि स्वत:चं असं अस्तित्वं देऊन गेली. एक- दोनदा नव्हे तर, तब्बल दहा- पंधरावेळा हा चित्रपट पाहणाऱ्यांची यादीही बरीच मोठी आहे. मुळात हा चित्रपट इतका लोकप्रिय का, हा प्रश्न आजवर बऱ्याचदा विचारला गेला. चला तर मग, नजर टाकूया सर्वांच्याच आवडीच्या ‘ये जवानी है दिवानी’विषयी चाहत्यांच्या मनात इतकी आत्मियता का आहे, यासंबंधीच्या काही कारणांवर…
रणबीर आणि दीपिकाची केमिस्ट्री-
प्रेमाची वेगळीच परिभाषा या चित्रपटाने देऊ केली. त्यातही रणबीर (बनी) आणि दीपिका (नैना) ही स्टार जोडी मुख्य भूमिकेत असल्यामुळे त्यांच्यात खुलणारं ऑनस्क्रीन प्रेम चाहत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेलं. इतकच नव्हे तर, प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या अनेकांनीच या बनी आणि नैनाच्या जोडीला आपल्या आदर्शस्थानी ठेवलं.
संगीत-
‘बलम पिचकारी’ म्हणत होळीचे रंग म्हणू नका किंवा मग ‘इलाही’ आणि ‘कबीरा’ ही गाणी म्हणू नका. ‘ये जवानी…’ मधील प्रत्येक गाणं हे त्या त्या वेळी त्या त्या दृश्यासाठी अतिशय सुरेखरित्या शोभून गेलं आणि चित्रपटाला खऱ्या अर्थाने चार चाँद लावून गेलं. त्यातच ‘बद्तमीज दिल माने ना’ म्हणत थिरकणाऱ्या रणबीरने पुन्हा एकदा तरुणींच्या काळजाचा ठोका चुकवला होता असं म्हणायला हरकत नाही.
मैत्री-
हल्ली धकाधकीच्या आणि अत्यंत साचेबद्ध आयुष्य जगण्यात प्रत्येकजण इतका व्यग्र झाला आहे की मित्रमंडळींसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी तशी फार कमी मिळते. पण, हा चित्रपट मैत्रीलाही तितक्याच समर्पकपणे आपल्यासमोर मांडून गेला. दंगा करणारे, मदत करणारे, खिल्ली उडवणारे वेळ पडल्याल रागे भरणारे मित्र नेमके काय असतात याचीच प्रचिती ‘ये जवानी है…’च्या निमित्ताने आली.
वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं
आयुष्याच्या मार्गावर चालणाऱ्यासाठीची महत्त्वाची शिकवण-
फक्त प्रेम आणि मैत्रीच या चित्रपटाचा गाभा नव्हते. तर आयुष्याच्या वळणवाटांवर चालण्यासाठीची अत्यंत महत्त्वाची शिकवणही या चित्रपटातील काही पात्रं देऊन गेली. कितीही प्रयत्न आणि आटापीटा केला तरीही काही गोष्टींना आपण मुकतोच. त्यामुळे या क्षणाला जिथे आहात त्या क्षणाचाच मनमुराद आनंद घ्या ही अत्यंत महत्त्वाची शिकवण या चित्रपटाने दिली. त्याशिवाय, ‘वक्त किसीके लिये नही रुकता, बितता वक्त है खर्च हम होते है’, ही ओळही बरंच काही सांगून गेली.
प्रवासावेड्यांसाठी परवणी-
रटाळ आयुष्यापासून थोडी उसंत घेत निसर्गाच्या सानिध्ध्यात काही क्षण व्यतीत करण्यासाठीही या चित्रपटाने अनेकांना प्रेरित केलं. ट्रेकिंग, मित्रमंडळी आणि निस्वार्थपणे सौंदर्याची उधळण करणारा निसर्ग या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला. ही प्रवासवेड्या मंडळींसाठी एक प्रकारची परवणीच होती. त्यामुळे ‘ये जवानी है दिवानी’ हा फिरस्त्यांसाठीही खऱ्या अर्थाने आवडीचा चित्रपट ठरला.