सध्या व्हॉट्स अ‍ॅपवर एक संदेश फिरतोय : ‘मगरीला पकडण्यासाठी सगळे तळेच सुकवल्याने तळ्यातले बिचारे छोटे छोटे मासे आणि अन्य जीवसृष्टीही नष्ट झालीय.’ तसंच काहीसं देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मोदी सरकारने एका फटक्यात रद्दबातल केल्याने झालंय. बिचारा सामान्य माणूसच सरकारच्या या चाबकाच्या फटकाऱ्याने पिचून निघालाय. जे लोक मोठय़ा प्रमाणावर काळ्या पैशांचे व्यवहार करतात, ते उद्योगपती, व्यापारी, राजकीय पक्ष, राजकारणी नेते, भ्रष्टाचारी नोकरशहा, कंत्राटदार, माफिया वगैरे या जाळ्यात खरोखरच अडकतील का, हा मात्र कळीचा मुद्दा आहे. तूर्तास मात्र सामान्य माणूसच या वज्राघाताने पार मेटाकुटीला आलेला आहे. तीच गोष्ट मराठी रंगभूमीची! आधीच तिचा जीव तोळामासा. नाटकधंद्याला बरे दिवस सहसा नसतातच. पूर्वी ज्या मराठी रंगभूमीवर दिवसाला तीन-तीन प्रयोग व्हायचे, तिथे आता फक्त शनिवार-रविवारीच प्रयोग लावले तर जरा बरं बुकिंग मिळण्याची आशा असते. तेही सगळ्याच नाटकांना नाही. अशात आता केवळ रोखीच्या व्यवहारावरच जगणाऱ्या मराठी नाटय़व्यवसायाला सरकारच्या या कुऱ्हाडीने जणू पक्षाघाताचा तीव्र झटकाच आलेला आहे. जुन्या नोटा अचानक रद्दीत निघाल्याने प्रेक्षकांच्या हाती पैसेच उरले नसल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक नाटय़प्रयोग रद्द करावे लागले आहेत. पुढचेही दोन-तीन दिवस अपवादात्मक प्रयोग वगळता नाटकांचे प्रयोग रद्द करण्याचा निर्णय बहुतेक निर्मात्यांनी घेतलेला आहे. याचं कारण हातात पाचशेची नोट असल्याशिवाय नाटकाचं तिकीट काढणं मुश्कील. आधीच अशी परिस्थिती असताना आता ही नोटच रद्द झाली म्हणताना नाटकाचं तिकीट काढायचं कसं? हा प्रेक्षकांसमोरचा प्रश्न आहे. तर- सद्य:स्थितीत दैनंदिन खर्च भागवण्यासाठीच पैशांची चणचण भासत असताना करमणुकीसारख्या माणसाच्या प्राधान्यक्रमात शेवटच्या स्थानी असलेल्या गोष्टीवर कोण पैसे उधळणार? त्यामुळे प्रेक्षकच नाहीत म्हटल्यावर प्रयोग तरी लावायचे कुणासाठी, हा नाटकवाल्यांना पडलेला प्रश्न आहे. तशात रद्द झालेल्या प्रयोगांतही निर्मात्यांना मोठाच आर्थिक फटका बसलेला आहे. कारण रद्द केलेल्या प्रयोगांचंही थिएटर भाडे आणि जाहिरात खर्च त्यांच्या अंगावर पडलेला आहेच. फक्त कलावंतांचं मानधन आणि प्रयोगाच्या वेळचा इतर किरकोळ खर्च तेवढा वाचला.. एवढंच.

आता काही निर्मात्यांनी स्वत:च नाटय़गृहाच्या बुकिंग काऊंटरवर डेबिट व क्रेडिट कार्ड्स स्वाइप करण्याचं मशिन ठेवून या समस्येवर मार्ग काढायचं ठरवलेलं आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, ते आता पाहायचं. या उपायात तांत्रिक आणि व्यवहार्यतेच्या काही अडचणी आहेतच. मराठी नाटकाला करंट बुकिंग- तेही रोखीनंच- जास्तकरून होत असल्याने  या मार्गाच्या यशस्वीतेबाबत बरेच निर्माते साशंक आहेत. (एवढं करून या उपायानंतरही होणारं बुकिंग हे प्रयोगाचा खर्च निघण्याएवढं तरी होईल की नाही, ही साधार भीतीही काहींना वाटते आहे.) आजच्या घडीला अनेक नाटकांचं फोन व ऑनलाइन बुकिंगही होत असलं तरी त्याचं प्रमाण एकूण बुकिंगच्या प्रमाणात अगदीच नगण्य असतं असा अनुभव आहे. कारण मराठी प्रेक्षकाला ही फारशी सवय नाहीए. या पाश्र्वभूमीवर सध्या लोकांना रोजचा घरखर्चच कसा निभवायचा, ही भ्रांत असताना नाटकासारख्या करमणुकीवर कोण पैसे खर्च करणार, ही चिंता नाटय़निर्मात्यांनी भेडसावते आहे.

‘ही जी समस्या निर्माण झालेली आहे, ती तात्पुरती.. दोन-तीन दिवसांपुरतीच असती तर गोष्ट वेगळी. किमान तसं भासवलं जरी जात असलं, तरीही चलनात नव्या नोटा मुबलक प्रमाणात येईपर्यंत माणसं सावधपणेच खर्चाचं नियोजन करणार, हे उघड आहे. सरकारच्याच अंदाजाप्रमाणे, डिसेंबपर्यंत सारं काही सुरळीत होईल असं म्हटलं जात असलं, तरीही अर्थव्यवस्थेला झालेल्या या लकव्याची गाडी रूळावर यायला किती काळ जाईल, हे सांगणं तसं अवघडच आहे. आणि तोपर्यंत प्राधान्यक्रमांत शेवटच्या स्थानी असलेल्या मनोरंजनासारख्या गोष्टीवर माणूस पैसे खर्च करणं मुश्कीलच आहे. ही स्थिती मार्च-एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे,’ असं मत मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केलं आहे. निर्माता संघाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही याबाबतीत काही उपाययोजना करण्याकरता पुढाकार घेणार का, असं विचारता ते म्हणाले, ‘निर्माता संघाच्या निवडणुकीत निवडून आलेलो असलो तरी आधीच्या कार्यकारी समितीने आमच्याकडे अजून रीतसर कार्यभाराची सूत्रे सोपवलेली नाहीत. त्यामुळे निर्माता संघाचा अध्यक्ष म्हणून सध्या तरी मला तांत्रिकदृष्टय़ा याकामी पुढाकार घेऊन निर्मात्यांची बैठक बोलावणं शक्य नाहीए. पण एक निर्माता म्हणून मी सहकारी निर्मात्यांसोबत या समस्येतून मार्ग काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. परंतु मला सगळ्यात जास्त काळजी वाटतेय ती बॅकस्टेज वर्कर्सची. त्यांचं हातावर पोट असतं. आणि प्रयोग रद्द झाला तर त्यांची रोजीरोटीच बंद होते. आणि नाटकाला प्रेक्षकच येणार नसतील तर प्रयोग लावण्याची हिंमत कुणी करू धजावेल असं मला तरी वाटत नाही. प्रचंड तोटा सहन करून प्रयोग करणं कुणालाच परवडणारं नाही. निर्माते, कलावंत यांच्यासह बॅकस्टेज कलाकारांनाही याचा मोठा फटका बसला आहे.. आणि येत्या काळातही बसणार आहे. निर्माते आणि कलावंत या संकटाचा कसातरी सामना करू शकतील, परंतु या संकटकाळात आमचे बॅकस्टेज कलावंत कसे तग धरू शकतील याचीच मला चिंता वाटतेय. अशा या आणीबाणीच्या प्रसंगी आम्ही सर्वानी आपापसातले मतभेद दूर सारून एकत्र येत या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला हवा असं मला वाटतं.’

मुंबईत ९३ च्या बॉम्बस्फोट आणि दंगलींनी मराठी रंगभूमीचा प्रेक्षक मोठय़ा प्रमाणावर तुटला. तो पुन्हा त्या प्रमाणात नाटकाकडे  वळलाच नाही. परिणामी सकाळी आणि रात्री होणारे नाटय़प्रयोग बंद पडले. नाटय़गृहं ओस पडली. फक्त दुपारचेच प्रयोग लावले जाऊ लागले. त्यांनाही मधल्या वारी प्रेक्षक येईनासे झाले. त्यामुळे मग साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशीच नाटकांचे प्रयोग निर्माते लावू लागले. त्यातून आता ‘शनिवार-रविवारची रंगभूमी’ अशी मराठी रंगभूमीची नवी ओळख निर्माण होऊ लागलेली असतानाच आता या नव्या संकटाने रंगभूमीचे कंबरडेच मोडण्याची शक्यता आहे. तथापि, मराठी नाटक पक्षाघाताच्या या आकस्मिक तीव्र झटक्यातून लवकरात लवकर सावरो, अशीच तमाम रसिक आणि नाटय़कर्मीचीही इच्छा आहे.

Story img Loader