सध्या व्हॉट्स अॅपवर एक संदेश फिरतोय : ‘मगरीला पकडण्यासाठी सगळे तळेच सुकवल्याने तळ्यातले बिचारे छोटे छोटे मासे आणि अन्य जीवसृष्टीही नष्ट झालीय.’ तसंच काहीसं देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मोदी सरकारने एका फटक्यात रद्दबातल केल्याने झालंय. बिचारा सामान्य माणूसच सरकारच्या या चाबकाच्या फटकाऱ्याने पिचून निघालाय. जे लोक मोठय़ा प्रमाणावर काळ्या पैशांचे व्यवहार करतात, ते उद्योगपती, व्यापारी, राजकीय पक्ष, राजकारणी नेते, भ्रष्टाचारी नोकरशहा, कंत्राटदार, माफिया वगैरे या जाळ्यात खरोखरच अडकतील का, हा मात्र कळीचा मुद्दा आहे. तूर्तास मात्र सामान्य माणूसच या वज्राघाताने पार मेटाकुटीला आलेला आहे. तीच गोष्ट मराठी रंगभूमीची! आधीच तिचा जीव तोळामासा. नाटकधंद्याला बरे दिवस सहसा नसतातच. पूर्वी ज्या मराठी रंगभूमीवर दिवसाला तीन-तीन प्रयोग व्हायचे, तिथे आता फक्त शनिवार-रविवारीच प्रयोग लावले तर जरा बरं बुकिंग मिळण्याची आशा असते. तेही सगळ्याच नाटकांना नाही. अशात आता केवळ रोखीच्या व्यवहारावरच जगणाऱ्या मराठी नाटय़व्यवसायाला सरकारच्या या कुऱ्हाडीने जणू पक्षाघाताचा तीव्र झटकाच आलेला आहे. जुन्या नोटा अचानक रद्दीत निघाल्याने प्रेक्षकांच्या हाती पैसेच उरले नसल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक नाटय़प्रयोग रद्द करावे लागले आहेत. पुढचेही दोन-तीन दिवस अपवादात्मक प्रयोग वगळता नाटकांचे प्रयोग रद्द करण्याचा निर्णय बहुतेक निर्मात्यांनी घेतलेला आहे. याचं कारण हातात पाचशेची नोट असल्याशिवाय नाटकाचं तिकीट काढणं मुश्कील. आधीच अशी परिस्थिती असताना आता ही नोटच रद्द झाली म्हणताना नाटकाचं तिकीट काढायचं कसं? हा प्रेक्षकांसमोरचा प्रश्न आहे. तर- सद्य:स्थितीत दैनंदिन खर्च भागवण्यासाठीच पैशांची चणचण भासत असताना करमणुकीसारख्या माणसाच्या प्राधान्यक्रमात शेवटच्या स्थानी असलेल्या गोष्टीवर कोण पैसे उधळणार? त्यामुळे प्रेक्षकच नाहीत म्हटल्यावर प्रयोग तरी लावायचे कुणासाठी, हा नाटकवाल्यांना पडलेला प्रश्न आहे. तशात रद्द झालेल्या प्रयोगांतही निर्मात्यांना मोठाच आर्थिक फटका बसलेला आहे. कारण रद्द केलेल्या प्रयोगांचंही थिएटर भाडे आणि जाहिरात खर्च त्यांच्या अंगावर पडलेला आहेच. फक्त कलावंतांचं मानधन आणि प्रयोगाच्या वेळचा इतर किरकोळ खर्च तेवढा वाचला.. एवढंच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा