नेहमीप्रमाणे ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावरही प्रादेशिक चित्रपटांचेच वर्चस्व पाहायला मिळाले. ‘व्हेंटिलेटर’, ‘कासव’, ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटांनी विविध विभागांमध्ये पुरस्कार मिळवले. यातील ‘दशक्रिया’ चित्रपटाला तब्बल तीन पुरस्कार मिळाले आहेत. नावात वेगळेपण असणाऱ्या ‘दशक्रिया’ चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले आहे. विशेष म्हणजे संदीप यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट. ‘दशक्रिया’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला असून, यातील सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी अभिनेता मनोज जोशी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच, सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी देखील याच चित्रपटाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेता मनोज जोशी यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, ज्याच्यासाठी तुम्ही इथे आहात त्या कर्मासाठी तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो तो सर्वोच्च आनंद आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटासाठी पुरस्कार मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ‘कासव’, ‘व्हेंटिलेटर’, ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटांचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला ही अभिमानाची बाब आहे. माझे आई-वडील, पत्नी यांचं पाठबळ माझ्यापाठी असल्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम, कांदबरीकार बाबा भांडसाहेब, लेखक संजय पाटील, दिग्दर्शक संदीप पाटील, कॅमेरामन महेश आणे या सगळ्यांना याचे श्रेय जाते. हे केवळ माझ्या एकट्याचे श्रेय नसल्याचंही ते म्हणाले. आता पुरस्कार मिळाल्यामुळे माझी जबाबदारीही वाढली आहे. याआधी मी जबाबदारी आणि समानतेने काम करत होतो. पण राष्ट्रीय पुरस्कारामुळे जास्त प्रकर्षाने काम करण्याची जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं.

‘दशक्रिया’ ही भानुदास नावाच्या एका शाळकरी मुलाच्या आयुष्याची कहाणी आहे. बुद्धी, चातुर्य व साहसपणाला लावून पोटाची खळगी भरु पाहणाऱ्या भानुदासची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाते आणि रोगट रुढींमुळे धर्माला आलेली अवकळा, विदारक जातिव्यवस्था, अर्थार्जनाचे एकाचवेळी संतापजनक व करुणाजनक वाटणारे पर्याय, पार कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, उच्च-नीच अशा अनेक वर्णांना व वर्गांना पोटासाठी एकाच पातळीवर आणणारी विचित्र समाजस्थिती हा चित्रपट मांडतो. वास्तवाला हल्ली जी भयंकर अवकळा प्राप्त झाली आहे त्याचे यथार्थ चित्रण करतानाच चित्रपट समाजातील विषमता आणि स्वार्थी प्रवृत्ती यांच्यावर प्रहार करतो. मातंग समाजातील गरीब लोक यात दाखविण्यात आले असून, सावकाराची भूमिका ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारली आहे. तर मनोज जोशी यांनी ब्राह्मणाची भूमिका साकारली आहे. आदिती देशपांडे, आशिष शेलार, मिलिंद शिंदे, जयवंत वाडकर, किशौरी चौगुले या कलाकारांच्याही यात भूमिका आहेत. साहित्यिक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ कादंबरीवरून चित्रपटाची कथा घेण्यात आली आहे. महेश आणे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संगीत दिग्दर्शन अमितराजने केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता महावीर यांनी साउंडची धुरा सांभाळली आहे.

Story img Loader