राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवारी) झाली असून यामध्ये मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकरच्या ‘न्यूटन’ या चित्रपटाने बाजी मारली. यामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठीचा विशेष गौरव करण्यात आला. ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘दिलवाले’, ‘अनारकली ऑफ आरा’ यांसारख्या बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या या अभिनेत्याच्या संघर्षाची कहाणी तुम्हाला माहित आहे का?
मूळता बिहारमधल्या गोपालगंज इथला असणाऱ्या पंकजने जवळपास अकरावीत असेपर्यंत शेतकाम केलं. शेतकरी कुटुंबातील पंकजचं राहणीमानसुद्धा अत्यंत साधं आहे. दहावीपर्यंत त्यांना चित्रपट म्हणजे काय हेसुद्धा माहीत नव्हतं. लहानपणी छटपुजेदरम्यान गावात आयोजित झालेल्या नाटकांमध्ये तो मुलीची वेशभूषा करत भूमिका साकारत. त्यावेळी त्याच्या अभिनयाची लोक फार प्रशंसा करत, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं. याच नाटकांतून त्याला अभिनयाची प्रेरणा मिळाली. चित्रपटात काम करायचं आहे, असं जेव्हा त्याने वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी फक्त इतकं विचारलं की, खाण्याइतके पैसे मिळतील ना?
त्यानंतर पंकजने दिल्लीतल्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची वाट धरली. पण इंग्रजी बोलता येत नसल्याने त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्याच्या अभिनय कौशल्याचं सर्वांकडून कौतुक होत असे.
६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘कच्चा लिंबू’ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
अभिनयात यश मिळणार नाही या भीतीने त्याने काही काळ हॉटेलमध्येही काम केलं. २००४ मध्ये तो मुंबईत आला आणि त्याच वर्षी त्याला ‘रन’ या चित्रपटात भूमिका मिळाली. मात्र, त्याच्या आठ वर्षांनंतर म्हणजेच २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून दाद मिळाली. सुलतान कुरेशी या भूमिकेसाठी त्याला आठ तासांची ऑडीशन द्यावी लागली.
‘फुकरे’, ‘रन’, ‘ओमकारा’, ‘गुंडे’, ‘मांझी- द माऊंटन मॅन’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारली. २००४ मध्ये त्याने मृदुला त्रिपाठीसोबत लग्न केलं.
65th national film awards : हे तर प्रसाद ओकचं यश- सोनाली कुलकर्णी
‘न्यूटन’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या ‘आत्मा सिंग’च्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. १४ वर्षांच्या अखंड मेहनतीनंतर आज त्याच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपात यश मिळालं आहे. यासाठी सध्या कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.