68th National Film Awards Ceremony: मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली होती. त्या विजेत्यांना आज दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगणला देण्यात आला.
करोनामुळे राष्ट्रीय पुरस्कार नियोजित वेळेपेक्षा एक वर्ष उशिरा प्रदान करण्यात येत आहेत. जुलैमध्ये ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली होती. तमिळ फिल्म ‘सूरराई पोत्रू’ला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आलं. तर, दिवंगत सच्चिदानंदन केआर यांना मल्याळम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अपर्णा बालमुरली हिला ‘सूरराई पोत्रू’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
सहाय्यक आणि प्रमुख कलाकार श्रेणीतील विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. तर, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म विजेत्या निर्माते आणि दिग्दर्शकाला प्रत्येकी अडीच लाख रुपये दिले जातील.
वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी –
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट(हिंदी)- तान्हाजी: द अनसंग वॉरियर
सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी)- तुलसीदास ज्युनिअर
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अजय देवगण (तान्हाजी: द अनसंग वॉरियर)
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट(मराठी)- गोष्ट एका पैठणीची
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म-
१. जून- सिद्धार्थ मेनन
२. गोदाकाठ आणि अवांचित- किशोर कदम
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- राहुल देशपांडे- मी वसंतराव
सर्वोत्कृष्ट बालकलाकार चित्रपट(मराठी)- सुमी
सर्वोत्कृष्ट बालकलाकार
१. अनिश गोसावी- टकटक
२. आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर- सुमी
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- फनरल (मराठी )
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.