बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण मुख्य भूमिकेत असलेला ’83’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. लग्नानंतरचा दीपिका आणि रणवीरचा हा पहिला एकत्र चित्रपट आहे. २४ डिसेंबर रोजी भारतातील जवळपास ३७४१ चित्रपटगृहांमध्ये ’83’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ’83’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. नाताळ आणि विकेंड असल्यामुळे चित्रपटाची कमाई येत्या दोन दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा : सुष्मिता आणि रोहमनचा झाला ब्रेकअप? बॉयफ्रेंडने अचानक सोडले घर
रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘८३’ हा चित्रपट भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा ही भारतानं १९८३ साली मिळवलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणनं रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.