83 Movie Review : ‘त्या रात्री कोणीही झोपले नव्हते. संपूर्ण देशासाठी हा एक असा आनंदाचा क्षण होता, ज्याचे वर्णन शब्दात करता येणे कठीण आहे.’ 83 या चित्रपटाच्या क्लायमॅक्सनंतर जेव्हा क्रिकेटपटू कपिल देव पडद्यावर येतात आणि ३८ वर्षांपूर्वीचा आनंद शेअर करतात, तेव्हा अक्षरश: अंगावर काटा येतो. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. ३८ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेवर हजारो पुस्तक, लेख लिहिण्यात आले आहेत. मात्र ही संपूर्ण घटना दिग्दर्शक कबीर खानने एका चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
दिग्दर्शक कबीर खान यांची निर्मिती असलेल्या ’83’ चित्रपटात कपिल देव, क्रिकेट, विश्वचषक जिंकण्याची जिद्द, परदेशात भारतीय क्रिकेटपटूंना मिळालेली वागणूक आणि विश्वचषक जिंकतानाचा ‘तो’ क्षण हे सर्व पाहून डोळ्यातून अश्रू तरळतात. यासोबतच कबीर खान यांना मोठ्या पडद्यावर विजयाची कहाणी सांगताना येणाऱ्या आव्हानाचीही कल्पनाही येते.
लेखकापुढे मोठं आव्हान
क्रिकेट प्रेमी असणारे आणि क्रिकेट न आवडणाऱ्या प्रत्येकालाच १९८३ चा विश्वचषक माहिती आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेळाचे मैदान गाजवण्यासाठी भारत सज्ज झाला होता आणि त्यावेळी ८३ चा विश्वचषक विजय हा महत्त्वाचा पैलू ठरला. एवढा मोठा क्षण दोन-अडीच तासात पडद्यावर कसा साकारायचा हे दिग्दर्शक किंवा लेखकापुढचे मोठं आव्हान होतं. मात्र ते आव्हान त्यांनी फार उत्कृष्ट पद्धतीने पेललं आहे.
यात सुरुवातीपासून प्रत्येक मिनिटाला तुम्हाला एक किस्सा दिसतो. या चित्रपटाच्या कथानकात भारतीय संघाच्या खेळाडूंच्या निवडीपासून ते विश्वचषक जिंकण्यापर्यंत प्रत्येक क्षण दाखवण्यात आला आहे. यात त्यांनी माजी कर्णधार कपिल देव ते मॅनेजर पीआर मानसिंग यांनी त्याचा अनुभव सांगितला आहे. मुंबई विमानतळावरुन इंग्लंडला जाण्यापासून ते विश्वचषक ट्रॉफी उचलण्यापर्यंत सर्व यात पाहायला मिळते. यामुळे आपण पडद्यावर एखादी डॉक्युमेंट्री बघतोय की काय असा भास क्षणभर होतो.
रणवीर सिंहची उत्कृष्ट भूमिका
तसेच या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंहने साकारली आहे. रणवीर सिंहची ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट असल्याचे जाणवते. त्याने साकारलेला कपिल देव हा हुबेहुब दिसतो. या व्यक्तीरेखेसाठी त्याने घेतलेली मेहनत भूमिकेत जिवंतपणा आणते. रणवीर सिंग हा या चित्रपटाचा नायक आहे आणि कपिल देव हे या क्षेत्रातील सर्वात मोठे नायक मानले जातात. कपिल देव यांच्याप्रमाणे मान झुकवणे, बोलण्यातील लाजाळूपणा, इंग्रजी बोलताना होणारा त्रास आणि त्यातील किस्से पाहताना रणवीर सिंहने हे पात्र कशाप्रकारे उत्तम प्रकारे हाताळले आहे याचा अंदाज लावता येतो.
रणवीर सिंहनंतर या चित्रपटात पंकज त्रिपाठींनी उत्तम भूमिका साकारली आहे. पंकज त्रिपाठी यांनी मॅनेजर पीआर मानसिंग यांची भूमिका साकारली आहे. पीआर मानसिंग हे चित्रपट आणि संघातील खेळाडूंमधील एक महत्त्वाचा दुवा ठरले. त्यांनी क्रिकेटचे मैदान आणि ड्रेसिंग रूममधील अंतर कमी केले आहे. पंकज त्रिपाठीचे उत्तम टायमिंग, मान हलवणं आणि त्याच्या डोळ्याने पुन्हा एकदा जादू केली. या चित्रपटात आणि विश्वचषकात पीआर मानसिंगची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे यातून दिसत आहे.
दीपिका पादुकोणच्या भूमिकेचे कौतुक
या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका पदुकोणने साकारली आहे. जी रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्येही रणवीर सिंहची पत्नी आहे. या चित्रपटात दीपिकाचे पात्र खूपच लहान आहे. पण ती जेवढा वेळ पडद्यावर दिसते, तेवढ्या वेळात तिच्यावरुन नजर हलतच नाही. या चित्रपटात दीपिकाच्या छोट्या भूमिकेचेही विशेष कौतुक केले जात आहे.
८३ हा चित्रपट क्रिकेटच्या मोठ्या घटनेवर आधारित असल्याने तो क्रिकेटप्रेमींसाठी विशेष पर्वणी आहे. क्रिकेटपटू, क्रिकेटप्रेमी, तसेच क्रिकेटचे डाय हार्ड फॅन असलेल्या सर्वांसाठी हा चित्रपट फारच खास ठरणार आहे. या चित्रपटात कबीर खानला बरच काही सांगायचे असल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे त्याने याबाबत अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्नही केल्याचे दिसत आहे. त्यामुळे 83 विश्वचषक विजयाची गाथा सांगण्याचे शिवधनुष्य त्याने लिलया पेललं आहे.
रिल आणि रिअल लाईफचा पुरेपुर वापर
या चित्रपटात क्रिकेटचे शॉट्स, रिल आणि रिअल लाईफ फुटजेचा उत्कृष्ट वापर आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडू व्हिव्हीयन रिचर्डचा स्वॅग दाखवण्यात दिग्दर्शकाने कोणतीही कसर सोडलेली नाही. याशिवाय इंग्रजी वृत्तपत्रांचे लिखाण, कपिल-गावस्कर यांच्यातील भांडणे, बीबीसीचा संप अशा अनेक गोष्टी पडद्यावर दाखवण्यात आल्या आहेत.
माझा जन्म १९८३ चा नाही. त्यामुळे त्यावेळीची ही संपूर्ण घटना पाहताना विशेष आनंद होतो. हा चित्रपट पाहणारा बहुतांश प्रेक्षक हा तरुण वयातील आणि ८३ मधील घटना न अनुभवलेला असणार आहे. त्यादृष्टीनेच याची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट पाहण्याचा एकंदर अनुभव प्रचंड छान वाटतो.
पाणावलेले डोळे आणि समाधानाने भरलेला ऊर
या चित्रपटात फक्त क्रिकेट नव्हे तर बॉलिवूड, देशभक्ती यासारखे विविध मुद्द्यांना हात घालण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला वेळप्रसंगी हसवतो आणि रडवतोही. चित्रपटगृहाबाहेर पडताना डोळे पाणवतात, पण चेहऱ्यावर मात्र एक समाधानाचे स्मितहास्य असते. भारताने विश्वचषक जिंकला तो क्षण पाहताना ऊर समाधानाने भरुन येतो आणि त्याचवेळी डोळ्यात अश्रू देखील तरळतात. हा चित्रपट पाहिल्यानंतर २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्याचा तो क्षण कसा असू शकतो याचा हुबेहुब अनुभव डोळ्यासमोर येतो.