‘दिल चीज क्या है’ ते ‘आजा आजा’ अशा विविध शैलीतील गाण्यांतून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपले गायकीतील अष्टपैलूत्व दाखवून दिले आहे. गेली अनेक दशकं त्या संगीत क्षेत्रावर वर्चस्व गाजवत आहेत. सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजेच आशाताई. त्यांच्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही. त्यांच्या आवाजाने चैतन्य निर्माण होऊ शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही. केवळ गायनच नाही तर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करण्याची त्यांची अदादेखील दिलखेचक असते.
वाचा : करिना नव्हे तर या अभिनेत्रींनीही केलंय गरोदरपणात काम
आपण सर्वांनीच त्यांना गाणं गाताना आणि लाइव्ह कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करताना पाहिलं आहे. इतकं वय होऊनही त्या अतिशय सुंदर पद्धतीने नाचू शकतात याचा कोणी विचारही केला नसेल. पण, सोशल मीडियार काही दिवसांपूर्वी व्हारल झालेल्या व्हिडिओमध्ये याचीही प्रचिती आली. एका कार्यक्रमादरम्यान, ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील ‘आम्ही ठाकरं ठाकरं’ या गाण्यावर आशा भोसले यांनी ठेका धरला होता त्याचाच हा व्हिडिओ आहे. त्यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. आशा भोसले या व्हिडिओमध्ये कमरेत साडी खोचून गाण्यावर ठेका धरताना दिसतात. विशेष म्हणजे आशाजींचे बंधू हृदयनाथ मंगेशकर हार्मोनिअमच्या साथीने स्वतः यात गाणं गाताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ बऱ्याच वर्षांपूर्वी चित्रीत केला असून, तो नक्की कोणत्या कार्यक्रमातील आहे याबाबत माहिती मिळालेली नाही.
Watch a 80 yr old @ashabhosle shake a leg with such panache! What an amazing lady!! pic.twitter.com/d15tLj69A5
— Shefali Vaidya (@ShefVaidya) June 5, 2017
मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत आशाजींनी पार्श्वगायन केले आहे. आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर- श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्यांनी आजच्या घडीतील हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गाणी गायली आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.