‘धूम ३’चा एकूण खर्च १५० कोटी रुपये, ‘क्रिश ३’ एकूण खर्च १५० कोटी रूपये आणि व्हीएफएक्ससाठीचा खर्च २६ कोटी रुपये.. म्हणजे बॉलिवूडमध्ये लागोपाठ आलेल्या तीन चित्रपटांमध्ये व्हीएफएक्स मोठय़ा प्रमाणावर असल्याने एकूण खर्च १०० ते १५० कोटींच्या घरात आहे. ‘क्रिश ३’मध्ये व्हीएफएक्सचा वापर सर्वाधिक असल्याने त्यासाठी शाहरूखच्या रेड चिलीजने २६ कोटी रुपये घेतले आहेत. पण, या सगळ्या आकडय़ांवर मात केली आहे ती ‘एग्गा’ फेम (हिंदीतील मख्खी) दाक्षिणात्य दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी. त्यांनी आपल्या आगामी ‘बाहुबली’ या चित्रपटातील व्हीएफएक्ससाठी त्यांनी तब्बल ८५ कोटी रुपये मोजले आहेत.
सध्याच्या चित्रपटांना व्हीएफएक्सशिवाय पर्याय नाही. त्यातही चित्रपट जर सुपरहिरोवर आधारित असतील किंवा ठरावीक कालखंडावर आधारित कथानक असेल तर त्या चित्रपटांना मोठय़ा प्रमाणात व्हीएफएक्सचा आधार घ्यावा लागतो. बॉलिवूडमध्ये शाहरूखचा ‘रा. वन’, ‘क्रिश ३’ आणि आता यशराजच्या ‘धूम ३’ चित्रपटात मोठय़ा प्रमाणावर व्हीएफएक्स वापरले गेले. त्यामुळे चित्रपटाच्या एकूण खर्चाच्या आकडय़ानेही शंभर कोटींचा आकडा पार केला.
सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी ‘कोचडियान’च्या खर्चाचा आकडाही तेवढाच मोठा आहे. पण, या सगळ्यांवर राजामौली यांच्या चित्रपटाने कडी केली आहे. राजामौली यांचा ‘एग्गा’ जो हिंदीत ‘मख्खी’ या नावाने प्रदर्शित झाला होता तोही व्हीएफएक्सचा आधार घेऊन बनलेला होता. हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला. राजामौली यांचा आगामी ‘बाहुबली’ हा चित्रपट सध्या त्याच्या विशेष कथानकामुळे आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चामुळे चर्चेत आहे.
‘बाहुबली’ चित्रपटाची कथा ही मध्ययुगीन काळातील आहे आणि तब्बल दोन तास हे वातावरण उभे करायचे आहे. यात त्या काळातील राजे, त्यांचे महाल, राजवाडे अशा अनेक गोष्टींसाठी मोठय़ा प्रमाणावर व्हीएफएक्सची गरज आहे. त्यामुळे केवळ व्हीएफएक्सवर राजामौली यांनी ८५ कोटी रूपये खर्च के ले आहेत. जवळजवळ वर्षभर या चित्रपटातील वातावरण आणि लुक कसा असेल याचा त्यांच्या टीमकडून अभ्यास सुरू होता. त्यानुसार व्हीएफएक्स टीमही याआधीच कार्यरत झाली असून त्यानंतर मग चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. ‘बाहुबली’ हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम या भाषांबरोबरच हिंदीतही एकाचवेळी प्रदर्शित केला जाणार आहे. आत्तापर्यंत दिग्दर्शक म्हणून राजामौली यांनी आपल्या चित्रपटांसाठी व्हीएफएक्सवर सर्वाधिक खर्च केला असला तरी खर्चिक व्हीएफएक्स करणारा चित्रपट ही त्यांच्या ‘बाहुबली’ची नवी ओळख ठरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा